Home Gardening : घरच्या घरी लावा ओव्याचे रोप
Marathi September 21, 2024 12:24 AM

आपल्या आसपास अशी अनेक झाडं असतात जी औषधीय गुणधर्मांसाठी ओळखली जातात. यात तुळस, पुदीना, कढीपत्ता यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त काहीजण आपल्या घरात ओव्याचं रोपसुद्धा लावतात. ओव्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्याची पानंसुद्धा खूप फायदेशीर ठरतात. ओव्याच्या झाडांचा वास दिवसभर घरात दरवळत राहतो. याचसाठी तुम्ही घरच्या घरी सुद्धा ओव्याचं रोप लावू शकता. कसं ते जाणून घेऊयात.

ओव्याचे रोप लावण्याची पद्धत

  • तुम्ही ओव्याचे बियाणे हे बियाणे केंद्रांवर किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता. फक्त ताजे आणि चांगल्या प्रतीचे बियाणे निवडा.
  • ओव्यासाठी वालुकामय, चिकणमाती माती आवश्यक असते ज्याचा निचरा चांगला होतो. आपण समान प्रमाणात माती, वाळू आणि कंपोस्ट यांचे मिश्रण बनवू शकता.
  • माती पूर्णपणे ओली करा. बिया खोल पेरा. काही बिया मातीने झाकून ठेवा. भांडे हलकं ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा
  • माती ओलसर ठेवा पण त्यात पाणी भरून राहील अशी ठेऊ नका. वरून माती कोरडी झाल्यावर पाणी द्यावे. जास्त पाणी टाळा, कारण यामुळे रोपाची मुळे कुजतात.
  • दर 2-3 आठवड्यांनी होममेड कंपोस्ट किंवा सेंद्रिय खतदेखील यासाठी वापरू शकता.
  • जेव्हा ओव्याची पाने 4-6 इंच लांब होतात तेव्हा तुम्ही कापणी सुरू करू शकता. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पानांची कापणी करा तेव्हा त्याचा जास्त सुगंध असतो. अथवा जेव्हा ते तपकिरी आणि कोरडे होतात तेव्हा तुम्ही बियादेखील गोळा करू शकता.
  • सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण ओव्याच्या पानांचा वापर करतात. पण या झाडाच्या पानांचा उपयोग उत्तम पकोडे, पराठे बनवण्यासाठीही केला जातो.

कोणत्या ऋतूत ओव्याचं झाड लावायचं?

पावसाळा किंवा हिवाळा ओव्याचं झाड लावण्यासाठी उत्तम ठरतो. पावसाळ्याच्या वातावरणात गरमी आणि गारवा दोन्ही असल्यामुळे या रोपाचं नुकसान होत नाही.

हे लक्षात ठेवा

  • पानांना तोडताना नेहमी खालून तोडण्याचा प्रयत्न करा. वरून तोडल्यानं वाढ व्यवस्थित होणार नाही. ओव्याच्या रोपट्याचे दाणे गरमीच्या वातावरणात पिकायला सुरूवात होते. ओवा 150 दिवसात पिकून तयार होतो.
  • रोपामध्ये फंगस किंवा अन्य किडे दिसू येत असतील तर ऑर्गेनिक कीटनाशकांचा वापर करू शकता. साबण, हिंगाचे पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोपट्यावर स्प्रे करा.

संपादन : निकिता शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.