Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात परतीच्या मॉन्सूनच्या सरी बरसणार, आज 'या' भागात पावसाची शक्यता
Times Now Marathi September 21, 2024 12:45 PM

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतलेली आहे. मात्र आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि कोकणासह राज्याच्या विविध भागात आज पावसाची शक्यता आहे. आज हवामान विभागाने कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

UOM च्या निवडणुकीसाठी सरकारला मुहूर्त सापडेना! 'तारीख पे तारीख' देत पुन्हा अनिश्चित काळासाठी निवडणूक लांबणीवर

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

हवामान विभागाने आज कोकणासह गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि साताऱ्यात आज हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी कोसळणार

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि बीडमध्ये वादळी वाऱ्यासह आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे अशी माहितीही IMD ने दिली आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील काही भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पुण्यात कसे असेल हवामान?

पुणे शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर प्रदेशात ललितपूर, झाशी, जालौन, महोबा, हमीरपूर, बांदा, चित्रकूट, कौशांबी, प्रयागराज, संतरविदास नगर, मिर्झापूर, सोनभद्र, वाराणसी, चंदौली, गाझीपूर, बलिया, देवरिया, कुशीनगर, गोरखपूर, महाराजगंज, संत कबीरनगर, बस्ती, सिद्धार्थनगर, गोंडा, बलरामपूर आणि श्रावस्ती येथे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत पावसाची विश्रांती

दिल्लीत गेल्या 3 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र, दिल्लीच्या तापमानात घट झाली असून वातावरणही थंड झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाची शक्यता नाही.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.