पंतप्रधान मोदी कोणत्या तोंडाने वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतात? सिनेट निवडणुकांवरून संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले....
एबीपी माझा वेब टीम September 21, 2024 01:43 PM

Sanjay Raut on Mumbai University Election : येत्या 22सप्टेंबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केलं आहे. याच मुद्याला घेऊन आता राज्याचे राजकारण तापले असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

एकीकडे आपल्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाही, तर दुसरीकडे जगातले महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या मुंबई विद्यापीठात सिनेटच्या माध्यमातून विद्यापीठाला एक दिशा दिली जाते. अशा ठिकाणी  कुलगुरूंवर दबाव आणून सिनेटचे इलेक्शन रद्द करण्यात आले आहे. कारण यांना आपल्या हरण्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) हे त्यांचे नेते आहेत, ते कायम वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतात. मात्र, गेले तीन वर्ष उलटून सुद्धा हे साधी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन घेऊ शकले नाहीत. विद्यापीठाचे इलेक्शन हे घेऊ शकत नाही, असे असताना कोणत्या तोंडाने हे वन नेशन, वन इलेक्शनच्या गोष्टी करत आहेत. असा घणाघाती सवाल करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. 

देशात एक प्रकारे निवडणुकांचा खेळ - संजय राऊत 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी पैशाने मते विकत घेऊ शकतात, अशाच ठिकाणी हे निवडणूक घेत आहेत. ज्या ठिकाणी ईडी, सीबीआय यांची ताकद लागते त्याच ठिकाणी हे लोक निवडणूक घेत आहेत. सिनेटच्या निवडणुकांमध्ये जे लोक मतदान करतात ते अतिशय हुशार, सुशिक्षित, युवा वर्ग, जे विकत घेऊ शकत नाही, असे लोक त्यात मतदान करत असतात. त्या ठिकाणी यांचे काही चालत नाही, त्या ठिकाणी यांनी निवडणूक रद्दच करून टाकली आहे. देशात एक प्रकारे निवडणुकांचा खेळ सुरू आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.

सेमी कंडक्टर प्रकल्प बोगस आणि भंपक प्रकार 

सेमी कंडक्टर प्रकल्प हा एक प्रकारे फसवणुकीचा प्रकार आहे. बोगस आणि भंपक प्रकार आहे. सेमी कंडक्टर प्रकल्प जर का तुम्ही जाऊन बघितला तर लक्षात येईल की, केवळ पाच ते सहा लोक तिथे काम करत आहेत आणि पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट सरकार तिथे करणार आहे. त्यांना काही दिशा नाही, काही नियोजन नाही. हा एक प्रकारे राज्यात भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचेही संजय राऊत म्हणाले. पाचशे सहाशे रुपये कोटी तुम्ही कोणाला देत आहात? त्यात कोणाची गुंतवणूक होणार आहे? ही फसवणूक बंद करा, असे देखील ते म्हणाले.

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.