पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
GH News September 21, 2024 04:10 PM

आपण नवीन विमानतळ करतोय त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. पण जे पुण्याचं विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने केलं आहे, त्याचं नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी चांगली संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. आम्ही त्यावर तात्काळ काम सुरू केलं. येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. तसेच केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल. आपण जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं तर त्याचा सर्वांनाच आनंद होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. पालखी मार्गाच्या कामाच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रमध्ये वारीच मोठं महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी यांनी वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला. तुम्ही भूसंपादन करा, बाकी बाकी आम्ही बघतो, असं गडकरी यांनी सांगितलं. आम्ही बऱ्यापैकी भूसंपादन केलं आहे, असं सांगतानाच नितीन गडकरी यांनी पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम केलं आहे. आता येत्या 27 तारखेला मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.