विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा नाही, वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले....
अभिषेक मुठाळ September 21, 2024 06:43 PM

मुंबई :आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांचे आता साऱ्यांना वेध लागले असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षाकडून रणशिंग फुंकले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला देखील तिकीट देण्यात आलंय.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचितच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी मात्र विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना स्पष्ट केली आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा मागितला होता. त्यानुसार आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला. मात्र आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही तो कुणालाही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचितने वेगळी रणनीती आखली असल्याची शक्यता आहे.

वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम मतदासंघातून मेघा किरण डोंगरे (बौद्ध), धामणगाव रेल्वे मतदासंघातून नीलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे (बौद्ध), साकोली मतदासंघातून डॉ. अविनाश नन्हे (धीवर), नांदेड दक्षिण मतदासंघातून फारूक अहमद (मुस्लीम), लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले (लिंगायत), औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे (मराठा), शेवगाव मतदासंघातून किसन चव्हाण (पारधी), खानापूर संग्राम माने ( वडार) यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर :  प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय .  रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर ही पहिली यादी जाहीर करतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.