IND vs BAN: गिल-पंतची शतकी खेळी, भारताचा डाव घोषित, बांगलादेशसमोर 515 धावांचं आव्हान
GH News September 21, 2024 04:10 PM

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव हा 287 धावांवर घोषित केला. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 227 धावांची आघाडी होती. त्यामुळे बांगलादेशला 515तं टार्गेट मिळालं आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने शानदार भागीदारी केली. तसेच दोघांनीही फटकेबाजी करत वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. त्या जोरावरच भारताला 500 पार मजल मारण्यात यश आलं. आता फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांवर बांगलादेशला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही झटपट गुंडाण्याची जबाबदारी असणार आहे.

दुसऱ्या डावात टीम इंडियाची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. रोहित शर्मा 5, यशस्वी जयस्वाल 10 आणि विराट कोहली 17 धावांवर बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 67 अशी झाली. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आणि दुसऱ्या दिवसापर्यंत एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या डावाला स्थिरता मिळाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात या जोडीने तोडफोड बॅटिंग केली. पंतने चौफेर फटकेबाजी करत शतक झळकावलं. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. पंत यासह भारतासाठी सहावं शतक करणारा संयुक्तरित्या पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला. पंतने महेंद्रसिंह धोनीच्या 6 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. पंत 109 धावा करुन बाद झाला. पंत आणि गिल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली.

पंतनंतर केएल राहुल मैदानात आला. पंतनंतर शुबमन गिलने टॉप गिअर टाकला आणि कारकीर्दीतील पाचवं शतक ठोकलं. गिलच्या शतकानंतर काही षटकांचा खेळ झाला. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला. भारताने 64 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 287 धावा केल्या. शुबमन गिल याने 176 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 फोरसह नॉट आऊट 119 रन्स केल्या. तर केएल राहुल 19 चेंडूत 22 धावांवर नाबाद परतला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज याने 2 विकेट्स मिळवल्या. तर तास्किन अहमद आणि नाहीद राणा या दोघांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

भारताचा डाव 287 धावांवर घोषित

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.