मध्यरात्री दरवाजा ठोठावला...; 3 मुलीसमोरच व्यक्तीची निर्घृण खून, तपासात पत्नी निघाली दोषी, अनैतिक संबंधांना अडथळा ठरलेल्या पतीला धाडलं यमसदनी
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे September 21, 2024 04:13 PM

पुणे: राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याचं चित्र आहे, कौंटुबिक वाद, एकतर्फी प्रेमातून खून अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. अशातच अनैतिक संबधाना अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराकडून खून करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे.

कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून टोकदार हत्याराने पोटात वार करुन खून करण्यात आला आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजवला. कोणी आले असल्याचा अंदाजाने अमोल याने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.दरम्यान अमोल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या. पण, आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तु घेऊन करुन पसार झाले.

मृत अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून त्यांना तीन मुली आहेत, या घटनेच्या दिवशी आरोपींने तोंडावर बुरखा घातला असल्याने मुलींनी आरोपीला पाहुणही ओळखता आले नाही. आपल्या डोळ्यासमोरच वडिलांचा खून झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थितीत नव्हत्या. मात्र तपासात अमोल निवंगुणे यांच्या पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यासह राज्याच्या अनेक भागात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. खून, चोऱ्या, हत्या यामुळे अनेक ठिकाणी भितीचं वातावरण निर्माण झाला आहेत. पोलिसांची भीती राहिली आहे का नाही? असा प्रश्न संतप्त नागरिक करत आहेत. पुण्यात रोज चोरी, हत्या, कोयत्याने दहशत माजवणे असे प्रकार सुरू आहेत, अशातच कौंटुबिक वादातून हत्या, विनयभंग अशा अनेक घटना घडतानाचं चित्र आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.