गुनाटमध्ये तरुणाच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या तोंडातून शेळीची सुटका
esakal September 22, 2024 04:45 AM

गुनाट, ता. २१ : गुनाट (ता. शिरूर) येथील कर्पे वस्तीवरील आर्यन कर्पे या सतरा वर्षीय तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बिबट्याने जबड्यात धरलेल्या शेळीचे प्राण वाचले. मात्र, तोंडात आलेले सावज सोडावे लागल्याने बिबट्याने पळ काढताना मोठ्याने डरकाळ्या फोडत आपला राग व्यक्त केला. बिबट्याच्या या दहशतीमुळे या भागात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.
कर्पे वस्तीवर शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सातच्या सुमारास येथील दहा- बारा व्यक्ती गप्पा मारत होते. मात्र, त्यांच्या डोळ्यांदेखत बिबट्याने थेट शेळीवर हल्ला चढवला. शेळीची मान बिबट्याने जबड्यात पकडून बिबट्या वेगाने निघून जात असतानाच जवळच उभ्या असलेल्या आर्यन याने पुढील धोक्याचा कसलाही विचार न करता हातातील काठीच्या सहाय्याने बिबट्यावर अवघ्या चार पार फुटांवर असताना प्रतिहल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बिबट्याला तोंडातील सावज सोडावे लागले.
दरम्यान, कर्पे वस्तीवरील विद्युत रोहित्र मागील आठ दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे या वस्तीवर संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य असते. या परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे महावितरणने हे विद्युत रोहित्र तातडीने बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत लवकरात लवकर पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.