विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत मतभेद, भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप
Shital Mandal September 23, 2024 12:54 AM

Atul Bhatkhalkar allegations Prakash Surve : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीत विविध मुद्द्यांवरुन वादाची ठिणगी पडत आहे.

सध्या महायुतीत जागावाटप, मुख्यमंत्रिपद यावरुन चर्चा सुरु आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या दोन आमदारांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. कांदिवली पूर्व मतदारसंघामध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील लोखंडवाला डीपी रोडच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप अतुल भातखळकरांनी केला आहे.

महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता

मुंबईतील कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील लोखंडवाला ते ठाकूर गावापर्यंतचा १२० फूट डीपी रस्ता १९९१ च्या डीपी प्लॅनमध्ये पास झाला होता. मात्र त्यावर महापालिकेने कोणतेही काम केले नाही. यानंतर कांदिवली पूर्वेचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत आनंद महिंद्रा यांच्याशी बोलून या डीपी रस्त्याचे काम करुन घेतले. महापालिकेने या रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम केले, असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

तसेच या ठिकाणी असलेल्या ठाकूर गावातील सिंग इस्टेटमधील या डीपी रोडसाठी अडसर ठरणाऱ्या घरांचे पुनर्वसन महापालिकेमार्फत करण्याची तयारी केली आहे. पण तरीही शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे या प्रकरणात वारंवार अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन आज अतुल भातखळकरांनी कांदिवलीत आंदोलनही केले. यामुळे आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकांसह जागावाटपांवरही चर्चा

दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. सध्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकांसह जागावाटपांवरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीत सातत्याने होणाऱ्या वादांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.