जलशिलेदार खैरे दाम्पत्याने सव्वा कोटी खर्चून गाव केले पाणीदार
esakal September 23, 2024 02:45 AM

शिक्रापूर, ता.२२ : कौटुंबिक आर्थिक विवंचनेमुळे उपजीविकेसाठी कधीकाळी संपूर्ण कुटुंबाने गाव सोडले होते. मात्र, काही वर्षांनी पुन्हा गावात येऊन थेट सव्वा कोटींची पदरमोड केली व गावच्या ३०० एकर क्षेत्राला बारमाही सिंचनाखाली आणले. या विधायक कार्यामुळे हिवरे (ता.शिरूर) येथील सरपंच दीपाली दीपक खैरे व उपसरपंच दीपक खैरे यांचा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

या विधायक कामामुळे चालू हंगामात तब्बल ५२ एकर जमीन आणखी ऊस लागवडी खाली आणून सरपंच दीपक खैरे यांनी गावासाठी नव्याने ३०० एकर क्षेत्र बारमाही ओलीताखाली आणण्याचा चमत्कार घडवून आणला. दिवंगत विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांचे गाव असलेले हिवरे (ता.शिरूर) हे शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वात दुष्काळी गाव. या गावात दुरून आणावयाच्या खर्चिक उचलपाण्याशिवाय कुठलेही कृषीसिंचन शक्य नसल्याची स्थिती. अशाच स्थितीत चार वर्षांपूर्वी गावचे सरपंचपदी दीपाली व उपसरपंचपदी त्यांचेच पती दीपक विराजमान झाले. अशातच गावासाठी कायमस्वरूपीच पाणीदार व्हावे म्हणून खैरे दाम्पत्याने गावचे जलसर्वेक्षण करून पाणीस्त्रोत हा साधारण चार किलोमिटरवर असलेला चासकमानचा कालवा निवडला. गावाला सोबत घेऊन या योजनेला त्यांनी हिवरे मांदळवाडी कृषी सिंचन प्रकल्प म्हणून नामकरण करीत यासाठी लागणारा खर्चही स्वत:च करणे सुरू केले. गावच्या सुमारे ३५० ते ४०० एकर क्षेत्राला पावसाळी पाणी देणारा एक तलाव असताना त्यात पाणी टाकल्यास गाव जलदार होण्याचे भारती ॲग्रो कंपनीच्या प्रकल्प अहवाल लक्षात येताच तिथून पुढे साधारण दीड किलोमीटरवर असलेल्या चासकमानच्या कालव्यावरून पाणी उचलण्याचा निर्णय झाला. यात आर्थिक पाठबळ दीपक खैरे यांचे तर श्रमदान गावातील युवकांचे ठरले आणि तसे झालेही.

हिवरे मांदळवाडी कृषी सिंचन योजना खरोखरीच राज्यातील प्रत्येक गावासाठी पथदर्शी आहे. अशी कामे गावागावात होण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेशी या प्रकल्पाबाबत आवर्जून चर्चा करून माझ्या गावातील हा आदर्श प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी होण्यासाठी प्रोत्साहन धोरण राबविण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिल्याची माहिती अमोल जगताप यांनी दिली.


मेंटेनन्स आणि वीजबिलाचीही तरतूद झाली
संपूर्ण योजनेसाठी दीपक खैरे यांचे योगदान पाहता गावानेही पुढाकार घेतला आणि या योजनेच्या मेंटेनन्स व वीजबिलासाठी तब्बल २२ लाखांची लोकवर्गणी करून ती कायम ठेव बॅंकेत ठेवून, त्याच्या दरवर्षी दोन लाखांच्या व्याजापोटी या योजनेची कायमची देखभाल दुरुस्तीचीही काळजी मिटविल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा हिवरेचे ग्रामपंचायत सदस्य अमोल जगताप यांनी दिली.


03998

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.