Ashutosh Gowariker: अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर
esakal September 25, 2024 06:45 AM

प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गोवारीकर यांचे नाव मोठे आहे. त्यांनी लगान, स्वदेस, जोधा अकबर, पानिपत यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

यंदा चित्रपट महोत्सवाचे दहावे वर्ष असणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. यावेळी महोत्सव संचालकपदी प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

“अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासाठी एक बहुमान समजतो. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग या सर्व सृजनशील दिग्दर्शकांच्या जोडीने एक अत्यंत चांगली कलात्मक प्रक्रिया यानिमित्ताने घडवता येईल याचा मला विशेष आनंद आहे," असे गोवारीकर यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर म्हटले आहे.

गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रियेद्वारे भारतीय सिनेजगतात मागील तीन दशकांहून अधिक काळापासून उल्लेखनीय योगदान दिले आहे. जगभरातील सर्वच महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिलेला आहे. तसेच ऑस्कर पुरस्कारांकरीता मतदान सदस्य म्हणून देखील ते कार्यरत आहेत.

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालकपदी राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. माजी संचालक अशोक राणे यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाल्याने सुनील सुकथनकर यांची निवड करण्यात आलेली आहे.

सुकथनकर यांनी मागील तीन दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत अतिशय उल्लेखनीय योगदान त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून दिलेले असून, दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

देशभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सुकथनकर यांनी ज्युरी अध्यक्ष व ज्युरी सदस्य या नात्याने काम केलेले आहे.

म्हणून कलर्सने घेतला 'बिग बॉस मराठी ५' अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय; रितेश देशमुख ठरलाय कारण?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.