कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
संदीप जेजुरकर September 25, 2024 01:13 PM

Swabhimani shetkari sanghatana : अफगाणिस्तानचा कांदा (Afghanistan Onion) भारतात आयात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani shetkari sanghatana) आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्याची आयात त्वरित धांबवा, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी दिला आहे.

सरकारनं अफगाणिस्तानातून भारतात कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्याची आयात न थांबवल्यास नाशिकअहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे..लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करतय. याचा अर्थ सुंभ जळला पण पिळ गेला नाही अशी टीका जगताप यांनी सरकारवर केली आहे.

शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत असताना कांदा आयातीचा निर्णय

सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून अफगाणिस्तानमधून कांदा आयात

कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयातीला सुरुवात ही केली असून पंजाबमधील अमृतसर, जालंधर शहरांमध्ये जवळपास 300 टन कांदा आयात करण्यात आला आहे. तसेच सीमेवर आणखी 50 ट्रकमध्ये तब्बल 1500 टन कांदा देशातील बाजारात येण्यासाठी तयार आहे. अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी काही प्रमाणात घटणार असून कांद्याचे दर 10  ते 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयात सुरू केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली जात असून कांदा आयातीवर बंदी न घातल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.