विविध दाखले, सेवा-सुविधा वेळेत द्या
esakal September 27, 2024 05:45 AM

पिंपरी, ता. २६ ः ‘‘सेवा हमी कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच सेवांमध्ये अधिक सुसूत्रता व सुलभता आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. सेवांच्या माध्यमातून नागरिकांना निर्धारित वेळेत दाखले आणि सुविधा प्रदान कराव्यात,’’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या सेवा हमी कायद्याअंतर्गत महापालिकेने नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा प्रदान केल्या जात आहेत. या सर्व कामकाजाचा आढावा आयुक्त सिंह यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेशी संबंधित विविध सेवा नागरिकांना निर्धारित वेळेत देण्यासाठी नियमावली आणि कालावधी निश्चित केला आहे. शहरात महापालिकेची एकूण ९४ नागरी सुविधा केंद्रे असून या केंद्रांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. महापालिकेच्यावतीने नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या संदर्भात विभागनिहाय माहिती सादर करण्याबाबत नागरी सुविधा केंद्राच्यावतीने अहवाल तयार करण्यात येत आहे, अशी माहिती उपआयुक्त राजेश आगळे यांनी दिली.

पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
कालबाह्य परवान्यासाठी नूतनीकरण सूचना, जाहिरात परवाना किंवा आकाशचिन्ह परवाना, नूतनीकरण परवाना, महापालिकेच्या जागेतील जाहिरात फलक परवाना शुल्क भरणे, नवीन परवाना मिळणे, परवाना दुय्यम प्रत, परवाना धारक किंवा भागीदाराचे नाव बदलणे, परवाना रद्द करणे, परवाना हस्तांतरण, परवान्याचे नूतनीकरण, भागीदाराच्या संख्येत बदल, व्यवसाय परवान्याचे स्वयंनूतनीकरण, व्यवसाय बदलणे, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यापार किंवा व्यवसायाकामी साठा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, सिनेमा चित्रीकरण परवाना, सिनेमा चित्रीकरण परवान्याचे नूतनीकरण, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जलनिस्सारण जोडणी देणे, अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे, अग्निशमन तात्पुरता किंवा सुधारित ना हरकत दाखला देणे, आक्षेप नोंदविणे, उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन, करमाफी मिळणे, कराचे मागणीपत्र तयार करणे, दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, नव्याने करआकारणी, पुन: कर आकारणी, मालमत्ता कर उतारा देणे, मालमत्ता पाडणे व पुनर्बांधणी कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे किंवा इतर मार्गाने मिळकत कर थकबाकी नसल्याचा दाखला देणे, रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, स्वयंमूल्यांकन, जोते प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी देणे (बांधकाम परवानगी, बांधकाम सुरू करण्याचा दाखला किंवा सुधारित बांधकाम परवानगी), भोगवटा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र, अनधिकृत नळजोडणी तक्रार नोंदविणे, तात्पुरते किंवा कायमस्वरुपी नळजोडणी खंडीत करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, नळजोडणी आकारामध्ये बदल करणे, नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे, पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग अथवा इतर संबंधित विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे, पाणी देयक तयार करणे, पाण्याचा दबाव व गुणवत्तेबाबत तक्रार करणे, पुनर्जोडणी करणे, नवीन प्लंबर परवाना आणि प्लंबर परवाना नुतनीकरण करणे, वापरामध्ये बदल करणे किंवा नवीन नळजोड देणे, खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र देणे, राज्याच्या खाद्य परवान्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, रस्ता खोदाई परवाना देणे आदी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.