नाटंबी परिसरात तिळाची फुले बहरली
esakal September 27, 2024 05:45 AM

महुडे, ता.२६ : भोर तालुक्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले तेलबिया पिकातील तीळ (कारळे) हे पीक जोमात आहे. नाटंबी (ता. भोर) परिसरासह नांदगाव, वाठार, पिसावरे, नाटंबी, बारे भागात पिवळ्या रंगाच्या फुलांचा बहार आल्याने हिरव्यागार शिवारातून तिळाच्या फुलांची शेती बहरली आहे.

तालुक्यात पूर्वी ७२ हेक्टर क्षेत्रातील विशेषकरुन माळरानावर, पडीक जमीन, बांधावर, परड्यात, आंतरपीक म्हणून शेतकरी या तिळाची शेती करत असे. यंदा कृषी विभागाकडून दिलेल्या आकडेवारीवरून यावर्षी २५ हेक्टरवर तीळ (कारळे) पिकाची पेरणी झाली आहे. तीळ पिकाबाबत जागृती अभावामुळे उत्पादकता कमी, सुधारित वाणांची लागवड कमी, रासायनिक खतांचा वापर नाही. योग्य अंतरावरील लागवडीकडे दुर्लक्ष, कीड व रोग नियंत्रणाकडे दुर्लक्ष यामुळे उत्पादन कमी होत असल्यामुळे तिळाची शेती सध्या फारच कमी प्रमाणात केली जाते आहे.
तीळ (कारळे) हे वार्षिक सरासरी एक ते दोन हजार मिलिमीटर पाऊस, हलक्या ते मध्यम प्रतीच्या व निचरा होणाऱ्या जमिनीत उत्पादन चांगले मिळते. पिकाची पेरणी साधारणपणे जून ते जुलैच्या पंधरवड्यात केली जाते. दरम्यान, नवरात्रीत घटावर तिळाच्या फुलांची नऊ दिवस माळ घातली जाते. त्यामुळे या फुलांना मागणी असते.

तीळातील पोषकत्व आणि औद्योगिक महत्त्व
* तीळ(कारळे) बियांमध्ये ३५ ते ४० टक्के तेल,
* २० ते २५ टक्के प्रथिने, १० ते २० टक्के तंतुमय पदार्थ,
* १० टक्के आर्द्रता व १२ ते १८ टक्के विद्राव्य शर्करा असते.
* कारळा तेलामध्ये लिनोलेईक आम्ल ७५ ते ८० टक्के
* ओलिक आम्ल ५ ते ८ टक्के असून हृदयरोग नियंत्रणासाठी उपयुक्त
* खाद्यतेल, वंगण व रंगनिर्मिती, साबण निर्मिती, पशू-पक्षीखाद्यासाठी उपयुक्त
* ग्रामीण भागात भाकरीबरोबर चटणी (तिळकूट) बनण्यास तिळाची उपयोग

01119

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.