वंचित 'लाडकी बहिणीं'साठी मोहीम राबविण्याची मागणी
esakal September 27, 2024 05:45 AM

चाकण, ता. २६ : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि लोकहिताची योजना सुरू केली आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांबाबत मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केली.
याबाबत त्यांनी निवेदने जिल्हाधिकारी, खेडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिली. त्यांनी याबाबत सांगितले की, खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्दची राजूबाई वस्ती, एनडे ठाकरवाडी, तळ्याचीवाडी, शेलूगावची ठाकरवाडी, तसेच अनेक आदिवासी ठाकरवाड्यांना भेटी दिल्या. त्यावेळेस तेथील आदिवासी ठाकर महिलांशी संवाद साधल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत, असे समजले. महिलांना योजना माहीत झाली आहे, परंतु अर्ज ऑनलाइन करत असताना त्यांचे शिक्षण नसल्याने अडचणी आल्या आहेत. त्याबाबत अंगणवाडी सेविकांना देखील संपर्क केला. खेड तालुक्यातील सत्तर टक्के आदिवासी महिला या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचे शिक्षण नसल्याने, तसेच गरिबीमुळे या महिला मोलमजुरीला जात असल्याने योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. राजकीय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या शिबिरांना या महिला कुठेही उपस्थित नव्हत्या. काहींनी अर्ज भरूनही बँकेच्या अडचणीमुळे त्यांना पैसे आलेले नाहीत. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी ठाकर वाड्या आहेत. तेथील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना यासाठी जबाबदारी द्यावी. विस्ताराधिकारी पातळीवरील अधिकाऱ्यांना या ठाकर वाड्या वाटून द्याव्यात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.