IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... BCCI ची मोठी घोषणा, बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय
esakal September 29, 2024 02:45 AM

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामागे मोठे कारण म्हणजे मेगा ऑक्शन आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक संघात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. प्रत्येक फ्रँचायझीने सपोर्ट स्टाफमध्ये बदल करून त्यादृष्टीने पावलेही उचलले आहेत.

आता याबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वाची बैठक शनिवारी (२८ सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंचे रिटेंशन आणि राईट टू मॅच कार्ड अशा काही नियमांचा समावेश आहे.

राईट टू मॅच कार्ड हा पर्यात यापूर्वी २०१८ आयपीएल हंगामाच्या लिलावात वापरण्यात आला होता. या पर्यायमुळे संघांना लिलावादरम्यान आपल्या संघात आदल्या हंगामात असलेल्या खेळाडूला पुन्हा संघात घेता येते. पण त्यांना लिलावात त्या खेळाडूला जितक्या रुपयांची बोली लागली आहे, त्याच किंमतीत त्याला संघात परत घ्यावं लागते.

टीम इंडियाचे 'शिल्पकार' IPL 2025 मध्ये RR ला चॅम्पियन बनवणार; जोडीला आला राहुल द्रविडचा साथीदार

दरम्यान, क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या बैठकीत फ्रँचायझींना ५ खेळाडूंना संघात कायम करता येऊ शकते, तसेच यंदाच्या लिलावात एक राईट टू मॅच कार्डही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पण जर फ्रँचायझींनी ५ खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना तब्बल ७५ कोटी रुपये मोजावे लागणार आहे. कारण पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे १८, १४ आणि ११ कोटी रुपये मोजावे लागणार आहे. तसेच जर फ्रँचायझींनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

त्याचबरोबर राईट टू मॅच कार्ड वापरून फ्रँचायझींना किमान एका खेळाडूला पुन्हा संघात घेता येणार आहे. त्याचबरोबर यंदा फ्रँचायझीच्या पर्समधील पैशांची मर्यादाही वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यंदा फ्रँचायझींची पर्स मनीची मर्यादा ११५ ते १२० कोटी करण्यात येऊ शकते.

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी? जय शाह यांची मोठी घोषणा

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलमधील मॅच फीबाबतही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी माहिती दिली आहे की आयपीएल २०२५ पासून प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना ७.५ लाख रुपये सामना शुल्क (Match Fees) म्हणून दिले जाणार आहेत.

त्याचबरोबर जे खेळाडू लीगमधील सर्व सामने खेळणार आहेत त्यांना त्यांच्या कराराव्यतिरिक्त १.०५ कोटी अतिरिक्त दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक फ्रँचायझीसाठी १२.६० कोटी रुपये एका हंगामातील सामना शुल्कासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.