सणांच्या दिवसांत हरभरा डाळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ
esakal September 29, 2024 02:45 AM

नीरा नरसिंहपूर, ता. २८ : दरवर्षी भाद्रपद अमावस्येला बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याला वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मराठी सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.
बैलपोळा सणादिवशी बळिराजा बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. यंदा सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळीसाठी लागणारी हरभरा डाळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. हरभरा डाळ प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी महागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो असणारी हरभरा डाळ आता १०५ ते १३० रुपये किलो झाली आहे.
यावर्षी काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो. जूनमध्ये साखर किरकोळ बाजारात ३७ रुपये प्रतिकिलो होती. ऑगस्टमध्ये हे दर ४० रुपयांवर गेले होते. सप्टेंबर महिन्यात तेच दर ४५ रुपयांवर गेल्याने दीड महिन्यांत या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविली जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.