World Senior Citizen’s Day : पालघरमध्ये ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
Marathi October 02, 2024 02:24 AM

1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे. ह्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर व आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्ट, पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद वृद्धाश्रम, पालघर येथे एक विशेष कार्यक्रम सोमवार दिनांक 30 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 च्या दरम्यान आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमात आनंद वृद्धाश्रमातील आजी आजोबा, इतर ज्येष्ठ नागरिक मंडळी व सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी ह्यांनी भाग घेतला. ह्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभाग पालघर चे कार्यालय अधीक्षक श्री. मयूर मोरे हे मुख्य अतिथी होते. ह्यावेळी आश्रमातील आजी आजोबांनी नृत्य, गाणी सादर केली. आश्रमातील सर्वात वयोवृद्ध 99 वर्षाच्या लक्ष्मीबाई म्हात्रे व आश्रमात सेवा करणारी चांगली सेवक वयस्कर व्यक्ति – प्रकाश मेहेर, आश्रमाचे खंदे समर्थक प्रदीप कोटक ह्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे 88 वर्षाचे प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते श्री जयवंत भाई चौधरी ह्यांचा सत्कार विद्यार्थी व मान्यवरांनी केला. आनंद वृद्धाश्रम चे Executive Director प्रकाश नारायण बोरगांवकर ह्यांनी सांगितले की 14 डिसेंबर 1990 रोजी UN Assembly ने ठराव पास करून 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर केले. ह्या वर्षाची थीम Ageing with Dignity आहे. आपण आपल्या आजी आजोबांचा व सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे. त्यांच्या जवळ बसून संवाद साधला पाहिजे. तसेच ज्येष्ठ व्यक्तींनी सुद्धा बदलत्या काळात बदलायला पाहिजे.

– जाहिरात –

आनंद वृद्धाश्रमाच्या ट्रस्टी मनीषा कोटक ह्यांनी सांगितले की आपण आपल्या आजी आजोबा ह्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला पाहिजे व त्यांना आनंद दिला पाहिजे.मुख्य अतिथि श्री मयूर मोरे ह्यांनी महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ व्यक्तींसाठी जे धोरण आहे व ज्या योजना आहेत, त्यांची माहिती दिली. तसेच दोन पिढ्यांना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ह्या कार्यक्रमा द्वारे दोन पिढ्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न होता असे बोरगांवकर ह्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.