Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज यांच्याविरोधात आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी
esakal October 02, 2024 05:45 AM

कोंढवा : कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलन करण्यात आले. जमावाच्या दबावानंतर कोंढवा पोलिसांकडून जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यावेळी कोंढवा परिसरातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये संभाजी महाराज यांची बदनामी व जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. जलील यांच्याच सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'छत्रपती संभाजीनगर-जालना' महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रूपीकरण केले होते.

सदरील घटना ही जलील यांनीच घडवून आणली असल्याचे म्हणत मंगळवारी (ता. १) विविध हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जनभावनेचा आदर करून जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावर असलेल्या संभाजी महाराजांच्या फलकाचे विद्रुपीकरण केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यानुसार तपास केला जाईल.

- विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.