Pune News : खडकवासला धरणालगतच्या नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू
esakal October 02, 2024 05:45 AM

खडकवासला : खडकवासला धरणा लगतच्या नदीपात्रातील खड्ड्यात बुडून १९ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलीस व अग्निशामक दलाने त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. मयूर गणेश नायडू (रा.भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली.

मयूर त्याची आई, वडील, चुलते यांच्यासोबत तो खडकवासला धरणातून पाणी सोडलेल्या नदीपात्रात, घरातील गोधड्या, चादर धुण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कपडे धुतली जात होती. पोहता येत असल्याने त्याने पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली. उडी मारल्यानंतर तो पाण्यात खाली गेला. तो परत वर आलाच नाही.

दरम्यान, कपडे धुण्यासाठी गेलेल्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्याच्या घरी असलेल्या आई व चुलतीने त्यांना फोन केला त्यावेळी तो पाण्यात ही बुडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला त्यांच्या शेजारी राहणारे अभिषेक कांबळे प्रशांत देशमुख आनंद मोरे मारुती चांदीलकर यांनी त्याच्या घरी गेले. त्यांना तो बुडाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. आणि त्या चौघांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, प्रशांत देशमुख यांनी आमदार भीमराव तापकीर यांना फोन करून धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाण्याचा प्रवाह कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार पाणी कमी झाले. परंतु तो एका खड्ड्यात पोहत होता.

त्या ठिकाणी पालिका व पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या वतीने गळ, रोप याच्या माध्यमातून साखळी तयार केली. खडकाच्या कपारीत जाऊन अडकला होता. गळ त्याच्या जीन्स पॅन्ट ला अडकल्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. असे अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले.

मयूर हा कोंढवे- धावडे येथील भैरवनाथनगर मधील श्री गणेश बाल मित्र मंडळाचा कार्यकर्ता होता. त्याला फिटनेस ची आवड होते. त्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा. सध्या तो अकरावी मध्ये शिकत आहे. किरकोळ काम करून तो देखील पैसे कमवत होता. आमच्या मंडळाच्या कार्यकर्ते नियमित सिंहगडावर ट्रेकिंग साठी जात होतो. यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असायचा. अशी माहिती त्याच्या शेजारी प्रशांत देशमुख यांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.