हरियाणातील प्रचार थंडावला
Marathi October 05, 2024 06:25 AM

राज्यातील सर्व 90 मतदारसंघात विधानसभेसाठी उद्या मतदान

वृत्तसंस्था/ फरिदाबाद

हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा धडाका गुऊवारी सायंकाळी थांबवण्यात आला आहे. तत्पूर्वी गेले दोन दिवस अखेरच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत उमेदवारांनी जोरदार प्रचार करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गांधी जयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधत प्रचारसभांचा धडाका लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारीही अनेक भागात सभा घेण्यात आल्या. तसेच अनेक उमेदवार भव्य रोड शोच्या माध्यमातून प्रचारात सहभागी होताना दिसत होते.

हरियाणात 5 सप्टेंबर रोजी उमेदवारी प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीच्या प्रचारालाही सुऊवात झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी अशा स्टार प्रचारकांनी सभा गाजवल्या. तसेच खासदार मनोज तिवारी आणि अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्याही सभा झाल्या. काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रचारात आघाडी घेतली.

बसपा सुप्रीमो मायावती, अभय चौटाला, माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, खासदार चंद्रशेखर हेदेखील आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ बाहेर पडताना दिसले. शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रोड शो आणि मोठ्या सभा घेऊन आपली चुणूक दाखवली. गुरुवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर आता उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन छुपा प्रचार करण्याची संधी साधणार आहेत.

1,031 उमेदवार रिंगणात

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 1,559 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर 1,221 अर्ज वैध असल्याचे आढळून आले, तर 388 फेटाळण्यात आले. सध्या 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. आता शनिवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून मंगळवार, 8 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी निवडणूक अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होतील. राज्यात एकूण 20,632 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. फरिदाबाद मतदारसंघात सर्वाधिक 1,650 केंद्रे आहेत, तर डबवली विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 400 केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी राखीव ईव्हीएमसह एकूण 27,866 ईव्हीएम (बॅलेट युनिट) वापरली जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.