शोध जोर्वे संस्कृतीचा
esakal October 06, 2024 11:45 AM

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

साधारण १९५० च्या आसपासची ही गोष्ट आहे. भारतीय पुरातत्त्व विद्येचे जनक ह. धी. सांकलिया नाशिकमध्ये उत्खनन करत होते. त्याच सुमारास, संगमनेर येथील मामलेदार कचेरीतील लिपिक डॉ. शंकरराव साळी यांना एक बातमी वाचायला मिळाली. संगमनेरपासून जवळच, प्रवरा नदीच्या किनारी जोर्वे गावात एका शेतकऱ्याला शेत नांगरताना काही रंगीत खापराचे नक्षीदार तुकडे, तांब्याच्या बांगड्या व कुऱ्हाडी मिळाल्या होत्या.

साळी यांनी तो सगळा ऐवज ताब्यात घेतला आणि सांकलिया यांना दाखवला. योगायोगाने नाशिक उत्खननात एका विशिष्ट थरात त्याचप्रकारचे खापराचे तुकडे सापडले होते. एका नव्या संस्कृतीचा शोध हा असा अकस्मातपणे लागला... या कृषक संस्कृतीला नाव देण्यात आले, 'जोर्वे संस्कृती..!'

जोर्वे संस्कृतीच्या दोनशेपेक्षा जास्त गावांचा शोध आजवर लागला आहे. ही संस्कृती इसवी सन पूर्व एक हजार ते पाचशे वर्षे महाराष्ट्रात अस्तित्वात होती. या संस्कृतीचं महत्त्वाचे शहर म्हणजे पुणे शहराजवळ असलेले ''इनामगाव''. गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या गढीमध्ये हाडे सापडत, त्यामुळे गावकरी तेथे जाण्यास धजत नसत.

१९६८ मध्ये पद्मश्री डॉ. ढवळीकर सर त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत इनामगावच्या ''त्या'' गढीत पाहणीसाठी गेले. पाच छोट्या-मोठ्या पांढरीच्या टेकड्यांनी ती गढी व्यापून गेलेली. त्यातल्याच एका टेकडीवर उत्खनन करण्याचे ठरवले. ढवळीकर सरांचे गुरु म्हणजे डॉ. ह. धी. सांकलिया. आयुष्यात एकदातरी एखादे प्रागैतिहासिक खेडे पाहायची त्यांची इच्छा होती, जी डॉ. ढवळीकरांनी पूर्ण केली. इनामगावला उत्खनन झाले आणि जो घडला तो इतिहास आहे.

महाराष्ट्रात अनेक प्राचीन-अर्वाचीन संस्कृती नांदून गेल्या. प्रत्येक संस्कृतीची दफन पद्धत फार वैशिष्ट्यपूर्ण होती. इनामगावात अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे दफनाचे प्रकार सापडले. घराच्या अंगणात पुरलेल्या त्या मध्यमवयीन व्यक्तीचे ते दफन होते. त्याचे पाय खाली घोट्यापासून कापून काढले होते. या नवीनच दफन पद्धतीला इनामगावने जगासमोर आणले. याविषयी बरेच मतमतांतरे आहेत.

काही अभ्यासकांच्या मते, त्या मेलेल्या व्यक्तीने भूत बनून परत येऊ नये आणि त्रास देऊ नये म्हणून त्याचे पाय कापले असावेत. तर काहींच्या मते, ती व्यक्ती आपला पूर्वज होती. आपल्यावर येणाऱ्या अरिष्टांपासून त्या पूर्वजाने आपले संरक्षण करावे आणि कुठेही जाऊ नये म्हणून तिचे पाय कापत असावेत.

मृत आत्म्याने कायम आपल्यासोबतच राहावे म्हणून घराच्या अंगणात पुरण्यामागेही हाच उद्देश असावा. मुळातच, या ताम्रपाषाणयुगीन-महापाषाणयुगीन अथवा कोणत्याही प्रागैतिहासिक संस्कृतीचे लिखित पुरावे नसल्यामुळे उत्खनन करणाऱ्या आणि त्या संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या ''पुरातत्त्व संशोधकांनी'' जे अंदाज मांडले आहेत, ते सर्वमान्य आहेत.

जोर्वे संस्कृती मधील दफन फार वेगळी आहेत. सर्वसाधारणपणे पुरुषांच्या दफनाची संख्या जास्त आहे. स्त्रियांचं दफन जास्त आढळून येत नाही. लहान बालकांचे मृत शरीर दोन कुंभामध्ये ठेवण्यात येई. छोट्या कुंभामध्ये त्या बालकाचे डोके तर मोठ्या कुंभामध्ये उरलेले शरीर ठेवले जाई.

जणू काही एखादे अर्भक आपल्या आईच्या उदरात झोपले आहे, अशाप्रकारे त्या मृत बालकाला दोन कुंभांमध्ये झोपवले जाई आणि दोन्ही कुंभांचे तोंड घट्ट बंद करून उत्तर-दक्षिण अवस्थेत पुरले जाई. कदाचित गर्भाची समजूत डोळ्यासमोर ठेवून या बाळाचा पुनर्जन्म होईल, या अपेक्षेनं अशास्वरूपाचा अंत्यविधी करण्यात येत असावा. मुलांचा मृत्यू झाल्यावर बहुतेक त्यांना अंगणात किंवा घरातच पुरण्यात येई.

प्रौढ पुरुषांचं दफन मात्र खड्डा खोदून करण्यात येई. त्यांना पुरण्याआधी त्यांचे पाय घोट्यापासून कापत असत. खड्ड्यामध्ये पुरताना डोकं उत्तरेकडं आणि पाय दक्षिणेकडं ठेवत असत. या मृत शरीरांसोबत एका वाडग्यात अन्न व मडक्यात पाणी ठेवले जाई.

मृत्यूनंतर जो प्रवास असतो, त्या प्रवासात उपयोगी पडावे या मृताम्यांना खाण्यापिण्याची ही सोय असते. बऱ्याच मातीच्या भांड्यांवर जहाजाचे चित्र काढल्याचे दिसून येते. मृत्यूनंतर नदीचा प्रवास करून जावे लागते, ही भावना त्या काळापासून मानवाच्या मनात ठाम आहे, याचेच हे प्रतीक आहे.

इजिप्तमधील ममीसोबत ज्या वस्तू सापडल्या, त्यांमध्ये जहाज किंवा मडक्यांवर काढलेले जहाजाचे चित्र आपल्याला आढळून येते. उत्तर जोर्वे काळात जे दफन झालेले मृतदेह प्राप्त झाले, त्यामध्ये बालकांचे प्रमाण अधिक आहे. डॉ. ढवळीकर यांच्यामते, या सर्व मुलांचा मृत्यू सिकल सेल मलेरिया रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाला असावा. कारण, या सर्व मृतांच्या टाळूचा भाग खूप जाड झाल्याचे दिसून येते.

या दफनांमधून आपल्याला किती गोष्टींचा उलगडा होतो, याचा आपण अंदाजसुद्धा लावू शकत नाहीत. 'महापाषाण' नामक एक युग आणि त्या काळात नांदणाऱ्या मानवाची एक संस्कृती प्रामुख्याने दख्खन भागात उदयास आली होती. हा काळ उत्तर जोर्वे कालखंडानंतर येतो.

प्रामुख्याने शिकारी करणाऱ्या भटक्या टोळ्यांची ही संस्कृती... या संस्कृतीचा उदय नेमका कधी झाला आणि हे लोक आले कुठून याविषयी कोणताही `ठोस पुरावा उपलब्ध नाही. या काळाला महापाषाण संस्कृती असे नाव देण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठमोठ्या शिळांच्या वर्तुळाचे तयार करण्यात आलेले दफनस्थळ.

महापाषाण म्हणजे Megaliths. विदर्भ भागात अशाप्रकारची शिळावर्तुळे फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण सर्वच शिळावर्तुळात मानवी सांगाडे सापडतीलच असे नाही. थोडक्यात, मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेले महापाषाणाचे स्मारक. या दफनांमध्ये तांबे व लोखंडाच्या अनेक वस्तू आढळून येतात. त्याचबरोबर, मृत व्यक्तीसोबत क्वचितच घोडा सुद्धा पुरलेला आढळून येतो.

घोडा हा पाळीव प्राणी असला, तरी तो मुख्यकरून वसाहतप्रमुख किंवा टोळीप्रमुखाकडेच असण्याची दाट शक्यता आहे. यांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्याने दफनस्थळी मानवी अवशेष क्वचितच सापडतात. एका घोड्याच्या दफनामध्ये त्याला घालवयाचे अलंकार सुद्धा सापडले आहेत. कदाचित या घोड्याला सजवून बळी दिलेला असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

मस्की (कर्नाटक) येथील शिळावर्तुळाच्या उत्खननातून १६ व्यक्तींचे अवशेष सापडले आहेत. ज्यात १६ ते ३२ वर्षे वयाच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. या अवशेषांवरून तत्कालीन मानवाच्या राहणीमानाची कल्पना आपल्याला येते. या लोकांचे आरोग्य फारसे चांगले नव्हते. घोड्याच्या सततच्या वापरणे मांडीच्या हाडांवर खुणा झाल्या होत्या, ती हाडे फाकून पाय फेंगडे झाले होते.

हाडांची वाढ खुंटली होती, म्हणजेच 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव होता. दाढांचा आकार मोठा होता पण समोरील दातांची वाढ अपुरी होती. यावरून मिश्र आहार संस्कृती असल्याचं आपल्याला समजून येतं. या दफनाचे प्रकार आपल्याला काय काय सांगून जातात..!!

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच. डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.