IND vs BAN, T20I: भारताच्या अर्शदीपचा बांगलादेशच्या सलामीवीरांना 'गुलिगत धोका', पाहा कसं केलं आऊट
esakal October 07, 2024 05:45 AM

India vs Bangladesh, 1st T20I: रविवारी (६ ऑक्टोबर) भारत आणि बांगलादेश संघात टी२० मालिका सुरू झाली असून पहिला सामना ग्वाल्हेरला होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि लिटन दास यांनी सलामीला सुरुवात केली. पण त्यांना फार वेळ टिकता आले नाही. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीपने लिटन दासला बाद केलं. त्याचा झेल रिंकु सिंगने पाँइंटपासून पळत येत पकडला. त्यामुळे लिटन दास ४ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर तिसऱ्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने परवेझला त्रिफळाचीत केले. त्यामुळे परवेझला ८ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतो आणि तौहिद हृदोय यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भागीदारी वरुण चक्रवर्तीने तोडली.

त्याने तौहिद हृदोयला १२ धावांवर हार्दिक पांड्याच्या हातून झेलबाद केले. पाठोपाठ आठव्या षटकात महमुद्दलाला मयंक यादवने १ धावंवरच बाद करत पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. बांगलादेशला १० षटकांच्या आतच पाचवा धक्का वरुण चक्रवर्तीने दिला. त्याने जाकर अलीला त्रिफळाचीत केले. त्याने ८ धावा केल्या.

या सामन्यातून भारताकडून मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव

बांगलादेश: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.