Nashik Crime : थायलंडच्या गांजाची नाशिकमध्ये विक्री; दोघांना अटक
esakal October 09, 2024 11:45 AM

नाशिक : थायलंड येथील अतिउच्च प्रतीचा, अतिमहाग असा गांजा नाशिकमध्ये विक्री करताना दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने लेखानगर परिसरात कारवाई करीत, सुमारे सव्वा दोन लाखांचा सातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. विशाल वसंत बावा-गोसावी (२५, रा. शिवशक्ती चौक, सिडको), लविन महेश चावला (२६, रा. सतनम बंगलो, इंदिरानगर) असे परदेशातील गांजा विक्री करताना अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. ( 2 arrested for Selling Thailand Cannabis in city )

अंमली पदार्थविरोधात कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी अंमली पदार्थविरोधी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, पथकाला सोमवारी (ता.७) रात्री मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लेखानगर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचला असता, दोघे संशयित गांजाची विक्री करताना आढळून आले.

दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांचा ६८६ ग्रॅम परदेशी गांजा जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित विशाल बावा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही अंबड व सातपूर पोलिसात मारहाण व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांच्या पथकाने बजावली.

एक पुडी दोन हजारांची

संशयितांकडून जप्त केलेला गांजा पाहून पोलिसही चक्रावले. भारतात आढळून येणार्या गांजापेक्षा अतिउच्च प्रतीचा जप्त केलेला गांजा होता. चौकशीत सदरचा गांजा सिंग नामक संशयिताकडून संशयितांना मिळाला होता. या गांजाची एक पुडी (१०ग्रॅम) दोन ते अडीच हजारांना संशयित विक्री करतात. तर भारतातील गांजाची एक पुडी ५० रुपयांना विक्री होते. थायलंडच्या या गांजाची आयात करणार्या सिंग नामक संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. याच गांजापासून हुक्का पार्लरमधील सुगंधी तंबाखुंत फ्लेव्हर म्हणून वापर केला जातो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.