'हटके' विचारांचा कलाविष्कार...
esakal October 09, 2024 11:45 AM

डॉ. मिलिंद नाईक

सुमारे दीडशे कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात पेटंट्स मिळविण्याचे, नवनवीन संशोधन होण्याचे प्रमाण चीन, अमेरिका, जर्मनी यांच्या तुलनेने अत्यंत कमी आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, आपली अत्यंत साचेबद्ध शिक्षणपद्धती. शालेय जीवनातच आपण कल्पकता जोपासणे, वाढवणे तर सोडाच, पण असलेली कल्पकतासुद्धा पुरेशी मारून टाकतो.

समस्यांचे निराकरण करणारी बुद्धिमत्ता जर निर्माण करायची असेल, तर कल्पकतेला पर्याय नाही आणि अशी समस्या निराकरण करण्याची कल्पकता तुमच्याकडे असेल, तर तुम्ही अभिकल्प (डिजाइन) क्षेत्राकडे वळायला हरकत नाही.

प्रवेश

गंमत म्हणजे, बारावी शास्त्र, वाणिज्य अथवा कला अशा कोणत्याही शाखेकडून इथे प्रवेश मिळविता येतो. कारण कल्पक समस्या निराकरणाला शाखेचे बंधन नसते. अभिकल्पना विचार अथवा ‘डिझाइन थिंकिंग’ यात केवळ कलात्मक कौशल्यांचा जसे चित्रकला, हस्तकला यांचाच अंतर्भाव नसून तर्कबद्ध विचार, शास्त्रीय दृष्टिकोन, विश्लेषणात्मक क्षमता यांचीही गरज असते.

याशिवाय तुमच्याकडे चांगली संवेदनशीलता, सामाजिक जाणीव, निरीक्षणशक्ती, त्रिमितीय विचार करण्याची क्षमता यांचीही गरज पडते. कला, वाणिज्य, शास्त्र - अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या सगळ्याचा संगम असलेले हे क्षेत्र आहे. ही केवळ कला शाखा निश्चितच नाही. यासाठीची प्रवेशपरीक्षा, अभ्यासक्रम आणि मूल्यांकन हे इतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आदीपेक्षा भिन्न असते.

अभ्यासपद्धती

सर्वसाधारणपणे ३ किंवा ४ वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम असतो. राष्ट्रीय अभिकल्प संस्था (एनआयडी), भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिकी संस्था (एन.आय.एफ.टी.) अशा नामांकित संस्थांसह सुमारे शंभर संस्था सध्या भारतात कार्यरत आहेत. या अभ्यासक्रमात अनेक उपशाखा आहेत, जसे प्रॉडक्ट डिझाइन, ग्राफिक्स डिझाइन, फॅशन डिझाइन, ॲनिमेशन, स्ट्रॅटेजिक डिझाइन, टॉय अँड गेम डिझाइन, न्यू मिडीया डिझाइन आदी. अशा विविध पर्यायांमधून आपल्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करता येते.

नोकरीची क्षेत्रे

या क्षेत्रातील नोकऱ्यादेखील विषयांप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तुम्ही कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला आहे यावर ते अवलंबून असते. भेटवस्तू निर्मिती, कपडे निर्मिती कारखान्यांपासून वाहने बनविणारे कारखाने, वेबसाइट्स आणि ॲनिमेशन्स इत्यादी बनविणाऱ्या आय टी कंपन्या, अंतर्गत सजावट करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, जाहिरात क्षेत्र अशा अनेक ठिकाणी डिजाइनर्सना मागणी असते.

सध्या जरी हे क्षेत्र तुलनेने लहान असलं, तरी भविष्यात स्पर्धा व मागणी मोठया प्रमाणावर वाढणार आहे. थ्री-डी प्रिंटर्सच्या जमान्यात सर्वसाधारण - सर्वांना सारखेच, एकसारखे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन याकडून सर्वच उद्योग हे व्यक्ती- अनुकूल (कस्टमाइज्ड) आवश्यकतेनुसारच आणि मागणी तेवढेच उत्पादन याकडे सर्व उद्योग वळणार आहेत. या पार्श्वभूमीवर डिझाइनर्स मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत.

उद्योगप्रकार

या क्षेत्रात दोन प्रकारचे उद्योग असतात. पहिल्या प्रकारच्या उद्योग संभाव्य ग्राहक ओळखून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आधीच तयार करून घेतात तर दुसऱ्या प्रकारचे उद्योग ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार तयार करून देतात. पहिला प्रकारच्या उद्योगांमध्ये कामाला पुरेसा वेळ दिलेला असल्याने वेळेचा ताण कमी असतो व स्वतःच्या कल्पकतेला पुरेसा वाव असतो.

मात्र, दुसऱ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये काम वेळेत पूर्ण करावयाचे असल्याने आणि ग्राहकांच्या स्वतःच्या काही आवडीनिवडी असल्याने कल्पकतेला कमी वाव असतो. चांगल्या डिझायनर्सना सुरुवातीच्या काळात सॉफ्टवेअर इंजिनिअर इतका म्हणजे वार्षिक पंधरा ते वीस लाखाचे वेतन मिळू शकते.

काहीवेळेला हे क्षेत्र एक ना धड असे आहे असे वाटू शकते. स्वतंत्र असे प्रॉडक्ट इंजिनीअर्स असतात, वेब डिजायनर्स असतात, ऑटोमोबाईल इंजिनियर्स असतात, इंटिरिअर डेकोटेरेटृर, फॅशन डिजायनर, आर्किटेक्ट असतात आणि तरीही ह्या वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज काय असे वाटू शकते, पण ग्राहकाला समजून घेण्याचे सामर्थ्य डिझायनरकडेच असते. त्यामुळे उत्पादनाचे मूल्य व विक्री वाढते. तुम्हाला नवनवीन कल्पना नेहमी सुचत असतील आणि नेहमीच बुद्धीला खाद्य असलेले आवडत असेल, तर या क्षेत्रासारखे दुसरे क्षेत्र नाही!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.