'वाणिज्य शाखेची व्यापकता'
esakal October 09, 2024 11:45 AM

प्रा. विजय नवले

बी.कॉम. म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स ही पारंपरिक पदवी सर्वांच्याच परिचयाची आहे. कॉमर्स क्षेत्रातील व्यापक संधींची सुरुवात या पदवी शिक्षणातून होते. पैसे, चलन, व्यापार, व्यवहार, आर्थिक रचना या जगाचा कारभार चालविण्यासाठीच्या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत.

त्यामुळे या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान ज्या शाखेत आहे, त्या शाखेला निश्चितच महत्त्व आहे. एका बाजूला सायन्सवर आधारित करिअर्सचा बोलबाला असताना कॉमर्स कुठेही मागे हटलेले नाही हे प्रत्यक्ष चित्र आहे. उलट कॉमर्स क्षेत्रातील संधींची व्यापकता आणि उपयुक्तता वाढत जाताना दिसत आहे.

कालावधी व पात्रता

बारावी नंतर बी.कॉम. हा तीन वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे. काही विद्यार्थी बारावी सायन्सनंतरदेखील कॉमर्सचा मार्ग निवडू शकतात. केंद्रीय स्तरावर स्वतंत्र किंवा विशेष प्रवेशपरीक्षा नाही. बारावी मधील गुणांवर आधारित मेरिटप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश मिळतात.

विषय

फायनान्शियल अकाउंटिंग, मायक्रो इकॉनॉमिक्स, फॉरेन एक्स्चेंज, मॅक्रो इकॉनॉमिक्स, कंपनी लॉ, अकाउंट्स, फायनान्स, टॅक्सेशन, इंडियन इकॉनॉमी, बँकिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, ई-कॉमर्स, स्टॉक मार्केट, कॉस्ट अकाउंटिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिजनेस, बिजनेस कम्युनिकेशन, ऑडिटिंग, बिजनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट, बिजनेस लॉ, ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स, उद्योजकता, कन्झ्युमर लॉ, फायनान्शियल मॅनेजमेंट, आदी.

प्रवेश कुणी घ्यावा?

आपले व्यवहारज्ञान उत्तम आहे असे स्वतःबद्दलचे ठाम मत असणाऱ्यांनी, आकडेमोड पद्धतीचे गणित आवडीने करणाऱ्यांनी, कामात अचूकता असणाऱ्यांनी, कॉमर्स विषयात रुची असणाऱ्यांनी, जबाबदारी घेऊन काम करणाऱ्यांनी, पैसे आणि त्या संदर्भात विशेष ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्यांनी, व्यवसायात कर्तबगारी करावी असे वाटणाऱ्यांनी, फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स यामध्ये काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांनी.

पुढील संधी

बी.कॉम. नंतर एम.कॉम. हे पारंपरिक उच्च शिक्षण आहे, परंतु त्याहीपेक्षा अन्य उपयुक्त परीक्षा, पदवी किंवा संधी महत्त्वाच्या मानल्या जातात. सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट हे सर्वोत्तम करिअर्स पैकी एक करिअर आहे. सीएस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी आणि सीएमए तथा सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाऊंटंट (पूर्वीचे आयसीडब्ल्यूए) ही दोन करिअर्सदेखील आकर्षणाची ठरत आहेत.

यासोबतच एमबीए फायनान्सचा विचार करणारे कॉमर्स पदवीधर आधीपासूनच एमबीएच्या प्रवेशपरीक्षांची तयारी करतात. सीएफए म्हणजेच चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट या करिअरची सध्या कॉमर्स पदवीधरांमध्ये चांगलीच ‘क्रेज’ आहे. सीएफपी अर्थातच सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर हे व्यक्तिगत स्तरावरील फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये काम करतात.

सर्वसामान्यपणे कोणत्याही पदवीनंतर असणाऱ्या अन्य संधी जशा की, एलएलबी, पत्रकारिता, मास मीडिया, इव्हेंट्स मॅनेजमेंट, एचआर/मार्केटिंग/इंटरनॅशनल बिजनेस असे अन्य कोणत्याही क्षेत्रातील एमबीए, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, ट्रेडिंग, डिफेन्स, आयटीमधील काम या संधीसुद्धा आहेतच.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.