ढिंग टांग : तुतारीने झाली झोपमोड..!
esakal October 09, 2024 11:45 AM

तुतारीच्या सणसणीत आवाजीनं इंदापूरच्या पाटीलसाहेबांना जाग आली की त्यांना जाग आल्यानंतर तुतारीचा निनाद घुमला, हे सांगणं अवघड आहे. पण दोन्ही घटना इतक्या लगोलग घडल्या की बस्स! आपल्याला जाग नेमकी कशामुळे आली, हे त्यांना कळेना. आढ्याकडे पाहिलं. ओळखीचंच होतं, याचा अर्थ आपण आपल्याच घरात आहोत, एवढं त्यांना कळलं. शरीर घामानं डबडबलं होतं.

याचा अर्थ काही तरी भयंकर स्वप्न पडलं असेल का? स्वप्नही धड आठवेना, हे जाणवून ते बेचैन झाले…पाटीलसाहेबांना झोपेचा काही प्रॉब्लेम नव्हता. गडी खुर्चीतही आरामात डुलकी काढत असे. मुळात ते बराच काळ खुर्चीतच असत. त्यामुळे बैठका, जेवणखाण, झोप अशा सगळ्याच गोष्टी खुर्चीतच होत. त्यांना मुळात तीन गोष्टी भारी आवडत. खुर्ची, झोप आणि खुर्चीतली झोप!!

सुदैवानं इंदापूरकरांनी आपल्या आवडत्या पाटीलसाहेबांच्या तिन्हीआवडत्या गोष्टी कायम मिळतील, असं पाहिलं. पाटीलसाहेबांना झोप आवडत होती, पण इंदापूरकरांना पाटीलसाहेब आवडत होते. तसा इंदापुरात पाटीलसाहेबांचा रुबाब होता. इंदापूरचं पाणी म्हणून त्यांना वळखलं जात असे. विकासाचा क्यानाल आपल्याकडंच वळला पाहिजे म्हणून त्यांनी भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं.

शेजारचे बारामतीकर आणि इंदापूरकरांचं तसं बरं नव्हतं. पण करता काय? मधल्या काळात जरा समस्या निर्माण झाली. खुर्चीच गायब झाली! पाटीलसाहेबांनी काळाची पावलं ओळखून गपचूप पार्टी बदलली. पण खुर्ची मिळता मिळेना. आता काय क्रावं? मग पाटीलसाहेबांनी जरा विचार केला, पण विचार करता करता त्यांना पेंगच आली. पण उभ्या उभ्या किती पेंगणार? त्यांना कुणीतरी स्टुल आणून दिलं. ‘साहेब, उभे का? बसून घ्या थोडंसं!’

थोडंसं बसल्या बसल्याही पाटीलसाहेब पेंगू लागले. कुणीतरी आणून जवळ पंखा आणून ठेवला. गारेगारपाण्याचं गडवा-भांडं आणून ठेवलं. आणखी कुणी तरी हौशी कार्यकर्त्यानं ‘साहेब,भजी आणू का?’ असंही विचारलं. पण नुसतंच विचारलं.भजी आणलीच नाहीत. शेवटी कंटाळून पाटीलसाहेब स्टुलावर बसूनच झोपले. असे बरेच दिवस गेले. पाटीलसाहेबांना छान झोप लागू लागली. वेळही हाताशी भरपूर होता. त्यातला बराचसा झोपण्यातच जायचा.

पाटीलसाहेबांची त्याला काही हरकत नव्हतीच. पार्टी बदलल्यानंतर त्यांना भलतीच गाढ झोप लागायला लागली. इतकी की कुणीही कितीही ठणठणाट करा, अजिबात जाग यायची नाही. अशी बिनघोर झोप दुर्मिळ असते. ‘पार्टी बदलल्यानंतर मला झोप चांगली लागते,’ अशी कबुलीच पाटीलसाहेबांनी जाहीररित्या दिल्यानंतर निद्रानाशाचा विकार जडलेल्या अनेकांनी पार्टी बदलून बघण्याचा सपाटा लावला.

आश्चर्य म्हणजे त्यांनाही झोपेची समस्या भेडसावणं बंद झालं. बघावं, तो बसल्या बसल्या घोरतोय, असं महाराष्ट्राचं चित्र दिसू लागलं.पण काम करणाऱ्या माणसाला झोपूनझोपून कंटाळा येणारच. तसा तो पाटीलसाहेबांनाही येऊ लागला होता. त्यात निद्रानाशाचा विकार जडलेले शेजारचे बारामतीकर दादाही येऊन त्यांच्या पक्षात ॲडमिट झाले होते. बारामतीकरदादांचं आणि पाटीलसाहेबांचं बरं नव्हतंच. त्यांची पुन्हा झोप उडाली!!

आता काय क्रावं? शेवटी भरपूर विचार करुन पाटीलसाहेबांनी ठरवलं की पुन्हा पार्टी बदलायची. इथं काय ऱ्हायलंय? नाहीतरी आपल्या झोपेचं खोबरं होणारच आहे. मग तिथं जाऊन पडलं राहावं!! नव्या जागेत पाटीलसाहेब पुन्हा किंचितसे आडवारले, आणि त्यांना झोपच आली. बराचकाळ डुलकी काढून झाल्यावर अचानक तुतारी वाजल्यानं ते जागे झाले. एकदम फ्रेश आवाजात ते स्वत:शीच म्हणाले,' हे बेष्ट काम झालं?’ एवढं बोलून होईतोवर त्यांचा डोळा पेंगुळलाच.-

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.