Navi Mumbai Crime: घुसखोरी करुन भारतात आल्या अन् नवी मुंबईत राहू लागल्या; वाचा पोलिसांनी 'त्या' बांगलादेशींना कसे पकडले
esakal October 09, 2024 06:45 PM

Crime News: नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळंबोलीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांविरोधात कारवाई केली आहे. चमेली पप्पूहशमेर सिखडे (३८), हमिदा शुकरीशौदत गाझी (२७) व सलमा मोशियर शेख (२९) अशी कारवाई केलेल्या महिलांची नावे असून या सर्व महिला घरकाम करणाऱ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळंबोली गाव, सेक्टर तीन येथील रामा नामा भगत चाळीमध्ये तीन बांगलादेशी बेकायदा राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अलका पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पथकासह सोमवारी (ता. ७) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कळंबोली येथील रामा भगत चाळीमध्ये छापा टाकला. यावेळी तीन बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याचे आढळून आले.

या महिलांकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागदपत्रे मिळून न आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, घुसखोरीच्या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भारतात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कळंबोली पोलिस करत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.