हरियाणाच्या निकालानंतर मविआत घमासान, राऊतांचा काँग्रेसला चिमटा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
GH News October 09, 2024 09:14 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला उघडपणे टोला लगावला आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण दोन्ही नेत्यांमधील टोला आणि प्रत्युत्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “काँग्रेसला हरियाणात असं वाटलं की, आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कुणाची गरज नाही. जिथे काँग्रेसला असं वाटतं की, आम्ही मजबूत आहोत तिथे ते स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. कुणीही स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका जाहीर केली पाहिजे. मग इतर पक्ष आपापले निर्णय त्या-त्या राज्यात घेतील”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत मीटिंगमध्ये आहेत. आम्ही बसून आणि भेटून बोलू. त्यांचा अग्रलेख वस्तुस्थितीवर होता की, मुद्दाम लिहायचं म्हणून लिहायचं होता, ते आता आम्ही विचारु. आम्ही समन्वयाने महाराष्ट्रात जे काम करतोय त्याचा अर्थ चांगलाच लावावा असा आमचा त्यांना सल्ला आहे”, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाविकास आघाडीत सुरु झालेल्या या घमासानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. हम साथ साथ है म्हणणारे, हम तुम्हारे है कोण म्हणायला लागले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “काँग्रेस असेल, शरद पवारांचा गट असेल किंवा उबाठा असेल हे सर्व पूर्ण शस्त्र चमकवून बसले होते की, कुठे हरियाणात भाजप हरतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो. पण त्यांना काल ती संधी मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित आहोत म्हणणारे, हम साथ साथ है म्हणणारे आता हम तुम्हारे है कोण? असे म्हणायला लागले आहेत. हे तुम्हाला पाहायला मिळतंय”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

‘देवेंद्र फडणवीस बालबुद्धीचे’, राऊतांची टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्याचा उल्लेख करत संजय राऊतांवर काल टीका केली होती. त्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भोंग्यांचं महत्त्व समजून घ्यावं. त्यांना जर मुंबईतील भोंग्याचं महत्त्व माहिती नसेल तर ते मराठी माणूस नाहीत. भाजपच्या पिपाण्या आहेत. त्या वाजतसुद्धा नाहीत. त्या पिपाण्यासुद्धा बाहेरच्या भाड्याच्या असतात. फडणवीसांनी त्या पिपाण्या वाजवून दाखवाव्यात. त्यांच्या तोंडातून फेस येईल. देवेंद्र फडणवीस बालबुद्धीचे आहेत. त्यांचे वाचन फार तोकडं आहे. त्यांना संघाच्या पाटशाळेत काय वाचायला देत होते किंवा काय शिकवणी होते ते मला माहिती नाही. ते भोंग्याची चेष्टा करतात हा मराठी माणसाचा अपमान आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.