महिला वाहकास धक्काबुक्की, आरोपीला दहा हजारांचा दंड
esakal October 09, 2024 10:45 PM

जुन्नर, ता. ९ : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाला धक्काबुक्की करून दुखापत करणाऱ्या आरोपीस खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
वाहक दीपाली योगेश शेळकंदे यांनी याबाबतची फिर्याद जुन्नर पोलिस ठाण्यात सन २०१७ मध्ये दिली होती. तपास अधिकारी पोलिस हवालदार बी. के. मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर ते भिवाडे या एसटी बसमध्ये आरोपी जयवंत यशवंत खरात याने तिकीट काढण्याच्या कारणावरून शेळकंदे यांना धक्काबुक्की करत दुखापत केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दुखापत करण्याच्या कारणावरून सत्र न्यायालयाने खरात यास दोषी धरून दंड, तसेच एक वर्ष मुदतीचा चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड घ्यावा, अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाचे वतीने सरकारी वकील सातपुते यांनी काम पाहिले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.