Pune : पिंपरी पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
esakal October 09, 2024 09:45 PM

Latest Pune News: पिंपरी पेंढार येथे बुधवारी(ता.९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता रवींद्र डेरे(वय ४०)या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. सुजाता डेरे या सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या समोर लघुशंकेला गेल्या असता पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

त्यांच्या ओरडण्याचा आवाज त्यांचे पती रवींद्र डेरे यांना आला असता ते लगेच घरा बाहेर आले तोपर्यंत बिबट्या सुजाता यांना जबड्यात धरून घरापासून १०० फुटां पर्यंत ओढत घेऊन गेला.रवींद्र डेरे यांनी बिबट्याच्या तावडीतून सुजाता यांना सोडविण्याचा प्रयत्न केला.

बांबूच्या सहाय्याने ते बिबट्याचा प्रतिकार करत होते.बिबट्याने सुजाता यांना जबड्यातून सोडले व तो बाजूला असलेल्या उसाच्या शेतात निघुन गेला.सुजाता यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती.प्रचंड प्रमाणात रक्तश्राव सुरु होता.यातच त्यांचा जागेवर मृत्यु झाला.

सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्या नंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनविभागाची टीम,ओतुर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

वनविभागाच्या वतीने पंचनामा करून सुजाता डेरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

सुजाता डेरे यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तसेच नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहेत. सदर घटना घडण्यापूर्वी या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन डेरे यांना होत होते तसेच त्यांनी वनविभागाला या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी देखील केली होती.

डेरे यांच्या घराच्या बाजूलाच गोठा असुन बिबट्या अनेकदा त्याठिकाणी येत असे.वनविभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करून देखील त्याठिकाणी पिंजरा न लावल्याने हि घटना घडली असल्याचे डेरे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काही महिन्यांपुर्वी याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात बाजरीची राखण करत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता.तसेच दोन दिवसां पुर्वी एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली होती. चार महिन्यात पिंपरी पेंढार,पिंपळवंडी व उंब्रज या परिसरातील २० बिबटे वनविभागाने जेरबंद केले होते.

असे असताना देखील या परिसरातील बिबट्यांची संख्या कमी होत नाही.आज याच परिसरात तीन बिबट्यांचे नागरिकांना दर्शन झाले होते. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले की सदर घडलेली घटना हि दुर्दैवी असुन या परिसरात ४० पिंजरे लावण्यात येतील.येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात केलेले आहेत.

थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा मागोवा घेण्याचे काम वनकर्मचारी करत आहेत.वनविभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे.यावेळी आमदार अतुल बेनके,सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी येऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली.

आमदार अतुल बेनके म्हणाले घडलेली घटना हि खुप दुःखद आहे.तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तालुक्यातील ग्रामस्थांना आवाहन करतो की आपल्याला ही स्थिती गांभीर्याने घ्यावी लागणार आहे.सरसकट बिबटे पकडण्याची मागणी आपण केली होती.तसेच पकडलेले बिबटे कुठे ठेवायचे हा वनविभागा समोर प्रश्न आहे.जुन्नर तालुक्यात बिबट्यांची घनता वाढलेली आहे.

विशेषतः पिंपळवंडी,काळवाडी,उंब्रज व पिंपरी पेंढार या गावात ती संख्या जास्त आहे तालुक्यातील सगळे बिबटे वनविभागाने पकडावे.लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात संबंधीत विभागाला भेटून मी प्रश्न मांडणार आहे.बिबटे मानवी वस्तीत नियमित येत असल्याने ते मनुष्यासाठी धोकादायक होत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.