प्रायोगिक नाटकांचे पुनरुज्जीवन
esakal October 19, 2024 06:45 AM

पु. लं. च्या ‘मॅड सखाराम’चा १३ ऑक्टोबरला मुंबईत रौप्यमहोत्सवी प्रयोग झाला. या प्रयोगांच्या मागे ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खंबीरपणे उभी आहे. अशाप्रकारे नामवंत आणि ज्येष्ठ रंगकर्मींनी नवनव्या प्रयोगांच्या मागे यथाशक्ती उभे राहिले पाहिजे. तरच ‘मॅड सखाराम’सारख्या अलक्षित कलाकृती रसिकांसमोर येतील. असेच एक जुने पण महत्त्वाचे नाटक अलीकडे मुंबईत मंचित झाले. ते म्हणजे युजीन आयनेस्कोच्या ‘खुर्च्या’चा मराठी अवतार. मराठीत जुन्या प्रायोगिक नाटकांचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे, या प्रक्रियेचे स्वागत!

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर (१९२८-२००८) यांचे अतिशय वादग्रस्त ठरलेले ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक १९७२ साली मंचित झाले. त्यात निळू फुले यांनी साकार केलेला ‘सखाराम’ आणि लालन सारंग यांनी साकार केलेली ‘चंपा’ या दोन पात्रांनी लोकप्रियतेचा कळस गाठला होता. नंतर ‘सखाराम’ इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांत गेले. मुंबईत मी ‘सखाराम’चे हिंदी आणि इंग्रजीत सादर झालेले प्रयोग बघितले आहेत.

ज्या काळात तेंडुलकरांचा ‘सखाराम’ नवनवे वाद ओढवून घेत होता, त्याच काळात पु.लं. देशपांडे यांनी ‘मॅड सखाराम’ हे विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ला समोर ठेवून प्रहसन लिहिले होते. पु.लं. उत्तम विनोदी लेखक होते की उत्तम व्यक्तिचित्रकार होते की उत्तम साहित्यिक विडंबनकार होते, याबद्दल वाद होऊ शकतो. अशा वादात मी ‘पु.लं. अतिशय दर्जेदार तसेच धारदार विडंबनकार होते’, या बाजूने मत देईन.

यासाठी पु.लं.ची अगदी सुरुवातीची ‘खोगीरभरती’, ‘नसती उठाठेव’ वगैरे पुस्तकांतील विडंबन वाचावी. जेव्हा महाराष्ट्रात महानुभवांच्या साहित्याच्या संशोधनाचा अतिरेक झाला तेव्हा पु.लं.नी ‘महाराष्ट्रातील सहानुभव पंथ’ असे त्याचे बहारदार विडंबन केले होते. ‘भुजपत्राचा द्रोणू की वाङ्मयाचा अपमानू? लिजिये जी गुलाबजांबू’ वगैरे विडंबनाने महाराष्ट्राला वेड लावले होते.

‘सुरंगा सासवडकरचे रहस्य’, ‘शांभवी - एक घेणे’ वगैरे लेख वाचले म्हणजे विडंबनकार म्हणून पु.लं. किती श्रेष्ठ होते, याचा अंदाज येतो. माझ्या मते पु.लं.ची प्रवासवर्णने ‘किर्लोस्कर’मधून क्रमशः प्रकाशित होऊ लागली, त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली (यात पु.लं.च्या प्रवासवर्णनांना अतिशय पूरक चित्रे काढणाऱ्या शि. द. फडणीसांचा मोठा वाटा होता.) आणि मराठी वाचक मूल्यभाव व्यक्त करणाऱ्या दर्जेदार विडंबनांना कायमचा मुकला.

आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे पु.लं.च्या ‘मॅड सखाराम’चा १३ ऑक्टोबरला मुंबईत रौप्यमहोत्सवी प्रयोग झाला. ही आगळीच घटना आहे. याचे कारण पु.लं.नी जरी ‘मॅड सखाराम’ पाचपन्नास वर्षांपूूर्वी लिहून ठेवले तरी ते मंचित झाले २०२३ साली. याला कारणीभूत आहे तरुण रंगकमी मंगेश सातपुते. त्यानेच ‘मॅड सखाराम’ दिग्दर्शित केले आहे. या प्रयोगांच्या मागे ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खंबीरपणे उभी आहे.

आणि हे उभे राहणे केवळ शाब्दिक नसून यात सोनाली कुलकर्णी आर्थिक मदतसुद्धा करत आहे! हे अतिशय कौतुकास्पद आहे. अशाप्रकारे नामवंत आणि ज्येष्ठ रंगकर्मींनी नवनव्या प्रयोगांच्या मागे यथाशक्ती उभे राहिले पाहिजे. तरच ‘मॅड सखाराम’सारख्या अलक्षित कलाकृती रसिकांसमोर येतील.

१९७२ साली आलेल्या ‘सखाराम बाईंडर’ने पुराणमतवादी, संस्कृतीरक्षकांची झोप उडवली होती. यात सखारामची भाषा जशी आक्षेपार्ह वाटली, तसेच चंपाचे रंगमंचावर साडी बदलणेसुद्धा. फार गहजब उडाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने नाटकावर बंदी घातली. याविरुद्ध नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक कमलाकार सारंग कोर्टात गेले. अनेक महिनेे कोर्टाकोर्टी करून आणि इतरत्र धावाधाव केल्यानंतर ते जिंकले.

हा सर्व जबरदस्त आणि बराचसा एक हाती लढा सारंगांनी ‘बाईंडरचे दिवस’मध्ये शब्दबद्ध केला आहे. या सर्वांवरचे प्रहसन म्हणजे पु.लं.च्या ‘मॅड सखाराम’मध्ये दिसते. यात पु.लं.नी सेन्सॉर बोर्डालासुद्धा सोडले नाही. अश्लील नाटक म्हणून गाजलेल्या ‘सखाराम’चे अनोख्या पद्धतीने पु.लं.नी विडंबन केले. ‘सखाराम’मध्ये तेंडुलकरांनी वापरलेल्या प्रतीकांचेसुद्धा फर्मास विडंबन यात आढळते.

उदाहरणार्थ मूळ ‘सखाराम’मध्ये तेंडुलकरांनी सखारामला मृदंग वाजवण्याची आवड असणारा बाईंडर दाखवला आहे, तर पु.लं.नी सखारामच्या हातात एकतारी दिली आहे. असं जबरदस्त विडंबन जरी पाचपन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते तरी ते मागच्या वर्षी म्हणजे २०२३ साली मंचित झाले. हे तसं अनाकलनीय आहे. पु लं.ची प्रत्येक ओळ वाचलेले अनेक वाचक असताना हे विडंबन कसे समाजासमोर प्रयोगाच्या माध्यमातून आले नाही, याचे फार आश्चर्य वाटते.

हा प्रयोग प्रेक्षणीय होतो. यामागे मंगेश सातपुतेंचे कल्पक दिग्दर्शन जसे आहे, तसेच सुनील जाधव (सखाराम), किरण राजपूत (लक्ष्मी) आणि अलका परब (चंपा) या कलाकारांचा अभिनय. त्यांना इतर कलाकारांनी यथोचित साथ दिली आहे. यातल्या वेशभूषेचा (महेश शेरला) खास उल्लेख केला पाहिजे.

असेच एक जुने पण महत्त्वाचे नाटक अलीकडे मुंबईत मंचित झाले. ते म्हणजे युजीन आयनेस्कोच्या (१९०९-१९९४) ‘खुर्च्या’चा मराठी अवतार. या रोमानियन फ्रेंच नाटककाराने हे नाटक १९५१ साली लिहिले होते. त्यांना आठ वेळा साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी मानांकन मिळाले होते. याचे मराठी रूपांतर वृंदावन दंडवते यांनी केले होते आणि १९६१ साली विजया मेहतांनी दिग्दर्शित केले होते.

यातील ९४ वयाच्या वृद्ध स्त्रीच्या भूमिकेत विजया मेहता तर ९५ वयाच्या वृद्ध पुरुषाच्या भूमिकेत माधव वाटवे होते. वृंदावन दंडवतेंचे भाषांतर चांगले झाले आहे. या नाटकातील वृद्ध पुरुषाला मनापासून वाटत असते की तो फार हुशार आहे आणि समाजाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर अन्याय केला. त्याची पत्नी त्याचा भ्रम चालू ठेवण्यात मदत करत असते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी लिहलेल्या या नाटकात माणसांच्या ठार एकटेपणावर भाष्य केले आहे.

आता पुन्हा एकदा ‘खुर्च्या’च्या मराठी अवताराचे प्रयोग होत आहेत. ‘खुर्च्या’चे असेच पुनरुज्जीवन २०२२ साली युरोपातही झाले आहे. आताच्या मराठी दीर्घांकाचे दिग्दर्शन मंगेश एस. पवार यांनी केले आहे. या दोनपात्री दीर्घांकात कविता मोरवाणकार वृद्ध स्त्रिच्या तर वृद्ध पुरुषाच्या भूमिकेत प्रमोद सुर्वे आहेत. हे नाटक आजही अस्वस्थ करते. उलट आज असे दाखवता येते की मोबाईलच्या जमान्यात माणूस आतून फार एकटा असतो. म्हणूनच कदाचित तो सतत आभासी जगात वावरत असतो.

जसा पु.लं.चा ‘मॅड सखाराम’शी संबंध आहे तसाच आयनेस्कोच्या ‘खुर्च्या‘शीसुद्धा होता आणि आहेही. हे नाटक जेव्हा मराठीत विजयाबाईंनी आणले तेव्हा अनेकांना ते समजलेच नाही. आपल्या मर्यादा मान्य करून शांत राहणे शक्य असताना पु.लं.नी या नाटकाची टिंगल करणारा, विडंबन करणारा ‘खुर्च्या, पण भाड्याने आणलेल्या’ असा लेख लिहिला होता. असाच प्रकार दुसऱ्या एका प्रकरणात पु.लं.बद्दल झाला होता. सुरुवातीच्या काळात पु.लं.नी मर्ढेकरांच्या कवितांशी यथेच्छ टिंगल केली होती.

मर्ढेकरांवर त्या काळात अश्लीलतेचा खटला भरला होता. यातून मर्ढेकर निर्दोष सुटले. हळूहळू समाजात मर्ढेकरांचे मोठेपण मान्य होऊ लागले. १९८०च्या दशकात पु.लं. आणि सुनीताबाई मर्ढेकराच्या कवितांचे जाहीर अभिवाचन करत असत! ज्या मर्ढेकरांच्या कवितांची पु.लं. देशपांडेंनी काही दशकांपूर्वी निर्घृण टीका केली होती त्याच मर्ढेकरांच्या कवितांचे जाहीर अभिवाचन केले. असो. आज मात्र असे दिसतेय की मराठीत जुन्या प्रायोगिक नाटकांचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे. या प्रक्रियेचे स्वागत!

(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.