टाटा समूहाचे पुढे काय?
esakal October 19, 2024 10:45 AM

- माधव जोशी, Joshimj2002@gmail.com

टाटा सन्सने २०२२ मध्ये आपल्या नियमावलीत बदल करून एकच व्यक्ती एकाच वेळी टाटा सन्सचा अध्यक्ष आणि ट्रस्टचा अध्यक्ष ही दोन पदे धारण करू शकणार नाही, असे ठरविले. त्यामुळे नोएल टाटा हे समूह अध्यक्ष होऊ शकत नाहीत. त्यांचे वयही ६६ वर्षे आहे. त्यामुळेही ते टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणजे खरे मालक या नात्याने ते समूहाच्या धोरणांना नवीन दिशा देऊ शकतील...

रतन टाटा यांच्या दु:खद निधनानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष कोण होणार याबद्दल उद्योग वर्तुळात खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. टीव्हीएस समूहाचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंग हे दोघे ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. नोएल टाटा जे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत, ते विश्वस्त होते. अध्यक्षपद टाटा कुटुंबात राहणार की बाहेर जाणार याबद्दल चर्चांना उधाण आले होते. नोएल टाटा यांची विश्वस्तांनी एकमताने अध्यक्षपदी निवड केली आणि सर्वांनाच हायसे वाटले.

टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स

भारतीयांच्या उच्च शिक्षणासाठी जमशेटजी टाटा यांनी जेएन एंडोमेंट १८९२ साली निर्माण केली. त्यानंतर केवळ आपल्या वडिलांच्या संपत्तीचाच वारसा न घेता राष्ट्रउभारणीची आवड आणि भारतातील जनतेवरील प्रेम यांचाही वारसा घेऊन जमशेटजी यांचे दोन सुपुत्र सर दोराबजी आणि सर रतनजी यांनी त्यांच्या हयातीत मोठी देणगी दिली आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला टाटा सन्समधील भागभांडवल हिस्साही ट्रस्टला देणगी म्हणून दिला. म्हणूनच टाटा सन्सचे दोन तृतीयांश भागभांडवल ट्रस्टकडे आहे.

टाटा सन्स ही समूहातील मुख्य कंपनी आहे, जिच्याकडे बाकीच्या कंपन्यांची अंदाजे तीस टक्के मालकी आहे, तर सोन्याची खाण असलेल्या टीसीएसची सत्तर टक्के मालकी आहे. टाटा ही नाममुद्रा (ब्रांड)सुद्धा टाटा सन्सच्या मालकीची आहे. संपूर्ण समूहावर या कंपनीचे नियंत्रण आहे. ट्रस्ट हे टाटा सन्सचे एक तृतीयांश संचालक नेमू शकतात आणि काही विषयांवर या संचालकांकडे नकाराधिकार आहे. टाटा सन्सच्या दृष्टीने ट्रस्ट हे मालक आहेत आणि म्हणून खूप महत्त्वाचे आहेत. ट्रस्ट दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करीत नाहीत आणि ट्रस्टी हे टाटा सन्स सोडले, तर इतर कंपन्यांवर संचालक म्हणून नेमले जात नाहीत.

काय बदल होतील?

समूहात अंदाजे १९० कंपन्या आहेत आणि त्यापैकी तीस कंपन्यांचे शेअर हे शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी, टाटा समूहाने ३० लाख कोटी रुपये (३६० अब्ज डॉलर्स) बाजार भांडवल ओलांडणारा पहिला भारतीय समूह बनून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ही रक्कम तेव्हा पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त होती.

एन चन्द्रसेकरन (चंद्रा) हे टाटा सन्सचे आणि समूहाचे २०१७ पासून अध्यक्ष आहेत. त्यांचा सध्याचा कार्यकाल फेब्रुवारी २०२७ मध्ये समाप्त होईल तेव्हा ते साडेत्रेसष्ट वर्षांचे असतील आणि पूर्णवेळ संचालकाचे निवृती वय ६५ असल्याने कदाचित त्याचवेळी त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमला जाईल किंवा जून २०२८ मध्ये जेव्हा ते ६५ वर्षांचे होतील, तेव्हा हा बदल होऊ शकेल.

२०२२ मध्ये टाटा सन्सने आपल्या नियमावलीत बदल करून एकच व्यक्ती एकाच वेळी टाटा सन्सचा अध्यक्ष आणि ट्रस्टचा अध्यक्ष ही दोन पदे धारण करू शकणार नाही, असे ठरविले. त्यामुळे नोएल टाटा हे समूह अध्यक्ष होऊ शकत नाहीत. त्यांचे वयही ६६ वर्षे आहे. त्यामुळेही ते टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणजे खरे मालक या नात्याने ते समूहाच्या धोरणांना नवीन दिशा देऊ शकतील. त्यांच्या अखत्यारीतील धंदे हे जरी मर्यादित होते तरी त्यांनी त्या धंद्यांची चांगली वाढ केली आहे. ते समूहाला नवीन दिशा देतील का, याबद्दल आजच अंदाज करणे कठीण आहे.

पालनजी मिस्त्री यांचे नोएल हे जावई आणि सायरस मिस्त्री यांचे मेव्हणे. पालनजी समूहाकडे टाटा सन्सचे १८ टक्के भाग भांडवल आहे. शेअर हे शेअर बाजारात सूचीबद्ध नसल्याने जवळजवळ चार लाख कोटी रुपये किंमत असलेल्या या शेअर्सची मालकी असूनही हा समूह गेली काही वर्षे वाईट अवस्थेत आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून २०१६ साली काढून टाकल्यानंतर या दोन समूहात वितुष्ट निर्माण झाले. सायरस यांनी रतन टाटा यांच्यावर खूप आरोप केले.

सहा वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने टाटा यांची काहीही चूक नाही, असा निकाल देत रतन टाटांवर स्तुतिसुमने उधळली, तर सायरस यांच्यावर कडक ताशेरे ओढले. सायरस यांचे वडील पालनजी हे रतन टाटा यांचे जवळचे मित्र. रतन टाटांनी चालविलेली पहिली गाडी पालनजी यांची होती, पण पालनजी या विवाद काळात खूप आजारी होते, नाहीतर हा वाद इतका चिघळला नसता. नोएल टाटा हे संबंध परत एकदा सौहार्दपूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.

यावरून आपल्या लक्षात आले असेल की नोएल टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झाले म्हणून लगेच काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. नोएल स्वतः टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे समूहात काय चालले आहे याची माहिती त्यांना थेट मिळत राहील आणि घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर त्यांना स्वत:ची छाप पाडता येईल.

पुढची पिढी

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा आल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढीकडे लागल्या आहेत. नोएल यांना तीन मुले आहेत. मुलगी लेह किंवा लिआ ही ३७ वर्षांची आहे. ती सध्या टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी शाखा इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल)मध्ये उपाध्यक्ष आहे. स्पेनमधील माद्रिद येथील आयई बिझनेस स्कूलमधून तिने मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००६ मध्ये ती टाटा समूहात सहाय्यक म्हणून रुजू झाली.

३४ वर्षीय माया टाटा यांनी लंडनमधील बेज बिझनेस स्कूल आणि इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री येथील वॉरविक विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यांना टाटा डिजिटल आणि टाटा अपॉर्च्युनिटीज फंडात कामाचा अनुभव आहे आणि टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

३२ वर्षीय नेव्हिल टाटा आपली आजी सिमोन टाटा यांनी स्थापन केलेल्या ट्रेंट लिमिटेड या समूहाची प्राथमिक किरकोळ शाखा म्हणून रुजू होऊन टाटा समूहाचा भाग बनले. सध्या स्टार बझारचे नेतृत्व करणाऱ्या नेव्हिलने यापूर्वी झुडिओ ऑपरेशन्सचे नेतृत्व केले होते. मायाप्रमाणेच नेव्हिलनेही लंडनच्या बेज बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली. दिवंगत विक्रम किर्लोस्कर यांची कन्या आणि टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया लिमिटेडच्या संचालक मानसी किर्लोस्कर (३४) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. रतन टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा विवाह सोहळा पार पडला.

नेव्हिल, माया आणि लिआ या तिघांची नोव्हेंबर २०२२ पासून टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली. हा ट्रस्ट कोलकाता येथील कॅन्सर हॉस्पिटल चालवितो.

टाटा घराण्याची प्रथा आहे की उच्च पद मिळविण्यासाठी दहा वर्षे विविध कंपन्यांमध्ये उमेदवारी करावी लागते. जेआरडी टाटा आणि विशेषतः रतन टाटा यांनी भट्टीमध्ये कोळसा ओतण्यापासून कामे केली होती. नोएल आपल्या मुलामुलींच्या बाबतीत हाच नियम लागू करतील आणि त्यांना विविध कंपन्यांमध्ये अनुभव देतील, अशी अपेक्षा आहे. ते सर्व सध्या तसे पाहता दुय्यम जबाबदाऱ्या सांभाळीत आहेत.

रतन टाटा आणि सायरस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळच्या पेप्सी जागतिक प्रमुख इंद्रा नूयी, वोडाफोन जागतिक प्रमुख अरुण सरीन आणि नोएल टाटा यांच्यासह अनेक जण समितीच्या समोर उमेदवार म्हणून होते. बहुधा हीच पद्धत चन्द्रसेकरन यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी वापरली जाईल.

आधीच्या समितीसमोर जागतिक कीर्तीचे उमेदवार होते हे लक्षात घेता नोएल यांच्या कुटुंबीयांपैकी फक्त त्यांची सून मानसी विक्रम किर्लोस्कर ही उमेदवार असू शकेल. तिलाही त्याआधी टाटा समूहातील काही कंपन्यांवर संचालक म्हणून नेमले जाईल.

रतन टाटा यांचे दु:खद निधन आणि नोएल टाटांच्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीमुळे निर्माण झालेल्या शक्यतांचा हा होता धावता आढावा.

(माधव जोशी हे ‘टाटा एक विश्वास’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.