'ॲमेझॉन'ला कोरडेपणाच्या झळा!
esakal October 19, 2024 10:45 AM

- डॉ. मालिनी नायर, nairmalini2013@gmail.com

हवामान बदलाचे दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत. जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी ॲमेझॉन नदी मागील चार दशकानंतर प्रथमच कोरडी पडली आहे. कधीतरी विस्तीर्ण वाहणाऱ्या ॲमेझॉनचे पात्र कोरडेठाक झाले असून नदीत नावालाच कुठेतरी पाण्याचे डबके दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे; मात्र हा काही शाश्वत उपाय नाही. त्यामुळे ॲमझॉनसह तिच्या उपनद्यांना जोडलेल्या लहान-सहान नद्या कोरड्या पडतील.

जगातील दुसरी सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ॲमेझॉन नदी ओळखली जाते. दक्षिण अमेरिकेत सुमारे सहा हजार ४०० किमी लांबीचे हे अथांग नदीपात्र कधी नव्हे ते कोरडे पडले आहे. ब्राझीलच्या भूवैज्ञानिकांनी १९६७ पासूनच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, यंदा ॲमेझॉनचे नदीपात्र सरासरीपेक्षा २५ फूट खोल गेल्याचे निदर्शनास आले आहे. एवढचे नव्हे, तर ॲमेझॉनच्या तीन उपनद्याही इतिहासात कधी नव्हे, इतक्या कोरड्या पडल्याचे आढळले.

पृथ्वीवरील अतिदुर्गम भागातून आणि घनदाट जंगलातून वाहणारी ॲमेझॉन नदी कधीकाळी दक्षिण अमेरिकेत दळणवळण आणि जलवाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्याय म्हणून ओळखली जात होती; परंतु सध्या ही नदी मरणासन्न अवस्थेत आली आहे. त्यावर उपाय म्हणून ब्राझीलने कल्पनाही करू शकत नाही, असे उपाय योजने सुरू केले आहे. दुष्काळातही ॲमेझॉनचे नदीपात्र प्रवाही राहावे, त्यातून जलवाहतूक सुरू राहावी, म्हणून ब्राझीलने ठिकठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ उपसणे सुरू केले आहे.

ॲमेझॉन दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील अँडिज पर्वतरांगेतून उगम पावते. जवळपास पाच देशांमधून प्रवास करत ती अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते. जैवविविधतेचे माहेरघर असलेल्या या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे काही ठिकाणी तिचे पात्र हे तब्बल ४०० फुटांपर्यंत खोल आहे.

मोठमोठे समुद्री जहाजही या नदीतून मार्गक्रमण करू शकतात; परंतु सध्या नदीपात्र कोरडे पडल्याने आणि त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, वाहतूक व्यवस्थेवर आणि परिणामी अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने सरकारला नदीचे उत्खनन करणे भाग पडले आहे, तसेच जगातील इतर देशांनाही अशाप्रकारच्या उपायांबाबत सजग करत आहेत.

ॲमेझॉनच्या पात्रात काही ठिकाणी पाणीपातळी इतकी कमी झाली आहे की, तळातील झाडेझुडपे, वनस्पतीही डोळ्यांनी दिसायला लागली. ही झाडेझुडपे नदीच्या जैवविविधतेचा भाग असले, तरी जलवाहतुकीसाठी त्या अडथळा ठरत आहेत. नदीची पाणीपातळी घटल्याने जहाजांची ये-जादेखील अडचणीत आली आहे. त्यामुळे केवळ जलमार्ग हाच पर्याय असलेल्या भागात मुलांना शाळेत जाण्यात, रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी, तसेच नदीकिनाऱ्यांवरील गावात प्राथमिक सेवा-सुविधा पुरविणेही अवघड झाले आहे.

ॲमेझॉनचे खोरे हे गोड्या पाण्याचे जगातील सर्वात मोठा स्रोत असून ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर परिणामांना समर्थपणे तोंड देण्यासाठी पूरक आहे. येथील घनदाट जंगले हे वातावरणातील उष्णतेच्या लाटा सामावून घेण्याची त्यांची क्षमता आहे. जगातील इतर देशांप्रमाणेच ब्राझीलमध्येही सरासरी तापमान वाढत असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.

सांता कॅटरिना फेडरल विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, १९८० च्या दशकापासून ॲमेझॉनच्या काही प्रदेशांमध्ये सरासरी तापमान दोन टक्क्यांनी वाढले असून ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणेच ॲमेझॉन आणि तिच्या उपनद्यांचेही तापमान वाढत असल्याने २०२३ मध्ये डॉल्फिनसह अनेक माशांचा मृत्यू झाला. १९७० नंतर सध्या ॲमेझॉनमध्ये वर्षभरातील उन्हाळ्याचा कालावधी एक महिन्याने वाढला आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड आणि हवामान बदल होय.

हवामान बदलाच्या आणि एकूणच पृथ्वीपुढे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी ब्राझील सरकारने एका टास्कफोर्सची स्थापना केली असून, पेरूनेही स्थानिक आणीबाणी जाहीर केली आहे. नद्यांच्या खोलीकरणामुळे या संकटातून काहीसा दिलासा मिळेल, याबाबत सरकार आशावादी आहे.

त्यासाठी ज्या ठिकाणी ॲमेझॉन नदीचे खोरे फारच उथळ झाले आहे, अशा ठिकाणी नदीतील राडारोडा, गाळ काढून ती अधिक खोल करण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून तेथेही पाणीपातळी वाढण्यास हातभार लागेल; परंतु ॲमेझॉन आणि तिच्या उपनद्यांच्या खोलीकरणामुळे नद्यांतील जीवसंस्था बाधित होईल किंवा त्या नष्ट होतील, तसेच अन्य दृश्य परिणामही जाणवतील, असेही मत काही संशोधकांनी मांडले.

उदा. सोन्याच्या खाणीतून वाहून येणारा पारा, तसेच जमिनीची धूप झाल्याने वाहत येणारे रासायनिक पदार्थ थेट नदीत मिसळतात. ते शोषून घेण्याचे काम नदीतील काही विशिष्ट झाडी करत असतात; परंतु हीच झाडेझुडपे नष्ट झाल्याने ही रासायनिक घटके नदीपात्रात विखुरली जातील, तसेच नदीचे खोलीकरण केल्याने हे रासायनिक पदार्थ पाण्यातील माशांच्या, तसेच अन्य जलचरांच्या संपर्कात येतील आणि अन्नसाखळीच्या माध्यमातून ते थेट माणसांपर्यंतही पोहोचतील.

पाऱ्यामुळे अनेक प्रजातींच्या प्रजननावर, वाढीवर परिणाम होतो, तसेच याशिवाय खोलीकरणामुळे नदीचे पाणी अधिक गढूळ होते, परिणामी तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू न शकल्याने पाण्यातील जीवसंस्थेला आणि त्यांच्या प्रजननालाही फटका बसू शकतो.

मुळात नद्या खोलीकरणाचा निर्णय हा पर्यावरणाच्या दृष्टीने काहीसा धोकादायक आहे. नदी खोल केल्याने व्यावसायिकदृष्ट्या अनेकांना त्याचा फायदा होईल, परंतु त्यामुळे ॲमझॉनसह तिच्या उपनद्यांना जोडलेल्या लहान-सहान नद्या मात्र कोरड्या पडतील. त्याचा फटका स्थानिक मासेमारीसह अनेक लहान गावांना बसेल, असाही इशारा अभ्यासकांनी वर्तविला. पावसाचे पाणी साठविण्यासाठी तलाव, विहिरी बांधणे, तसेच जलसंधारणाचे शास्त्रोक्त पर्याय अवलंबता येऊ शकतात.

हरीतवायू उत्सर्जनामुळे हवामान बदलाच्या संकटाला आपल्या सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक देशांनी शाश्वत पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवरही काम करण्याची आवश्यकता आहे. सध्या ॲमेझॉन खोऱ्यात जे काही घडत आहे, त्याचा थेट फटका सध्या आपल्याला बसत नसला, तरी आपल्या मुलांना वा पुढील पिढीला त्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.