देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
रजत वशिष्ठ, एबीपी माझा October 20, 2024 12:43 AM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असलं, तरी अजूनही 30 ते 35 जागांवर तिढा कायम आहे. महायुतीमधून भाजपची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजप नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज (19 ऑक्टोबर) नितीन गडकरींच्या निवासस्थानी पोहोचले. 

नितीन गडरींच्या निवासस्थानी तब्बल दोन तास चर्चा

फडणवीस आणि बावनकुळे यांनी तब्बल दोन तास नितीन गडकरी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुंबईतून नागपुरात दाखल झाल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर संध्याकाळी पावणे आठ वाजेपर्यंत तिघांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे भाजपच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हा उत्सुकतेचा विषय आहे.

कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? 

दरम्यान, या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी विदर्भातील जागा संदर्भात गडकरींशी प्रदेश भाजप नेतृत्वाने चर्चा केल्याची माहिती आहे. विदर्भातील जागांसंदर्भात नेमके काय निर्णय झाले आणि त्या संदर्भात आणखी काय करायला हवं, याबद्दल गडकरीचे म्हणणं जाणून घेण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात भाजपच्या प्रचाराच्या रणनीती संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काही वेळासाठी भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर सुद्धा सहभागी झाले होते. 

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी कधीही येऊ शकते, असे म्हटले आहे. ज्या जागा मोकळ्या झाल्या आहेत त्यांनी आपापल्या सोयीनुसार आपापल्या जागा जाहीर कराव्यात, असे तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. ते म्हणाले की, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अडकलेल्या निम्म्याहून अधिक जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही दोन दिवसांत सर्व जागा निश्चित करु असे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल मी अमित शाह यांच्याशी बोललो. चर्चा आणि बैठक झाली. महायुतीच्या जागांवर सकारात्मक चर्चा झाली. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागावाटप लवकरच होईल. शिंदे यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.