आपण मानवता विसरलो आहोत का?
esakal October 20, 2024 02:45 AM

पुणे, ता. १९ : ‘‘अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली. परंतु त्याला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन मिळाल्याने आम्हाला धक्काच बसला. आम्हाला यंत्रणेकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सर्व निराशाच दिसत आहे. चालकाकडून किमान क्षमायाचना होईल किंवा मानवतेच्या भावनेतून कोणी आमचे सांत्वन करेल अशी अपेक्षा होती. परंतु कोणीही साधी विचारपूस केली नाही. आपण सर्व मानवता विसरलो आहोत का? न्याय कशाला म्हणतात? असा उद्विग्न सवाल कोथरूड बसस्थानकासमोर काँक्रिट मिक्सरने धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या आरतीचे वडील सुरेश मनवानी यांनी केला.
पौड फाट्याजवळ मद्यधुंद टेम्पोच्या धडकेने दुचाकीवरील गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला होता. ‘‘या अपघातामुळे माझा संसार मोडला आहे. माझ्या मुलांचे आईचे छत्र हरपले आहे. या जगात सर्व काही मिळेल पण आईची माया कुठे मिळणार नाही. मद्यपी टेम्पो चालकाला अटक होईल, शिक्षा होईल. परंतु आमच्या कुटुंबातील गेलेली व्यक्ती पुन्हा कधीही येऊ शकत नाही याचं खूप दुःख आहे. भविष्यात अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे,’’ अशी भावना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गीतांजली यांचे पती श्रीकांत अमराळे यांनी व्यक्त केली. अपघातात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना काय यातना भोगाव्या लागतात, त्याची ही मन सुन्न करणारी दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.


अवजड वाहने शहरांमध्ये विविध कारणांसाठी येणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अवजड वाहनांवर बंदी घालण्याऐवजी त्यावर काय वेगळ्या उपाययोजना करता येतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. प्रगत देशांमध्ये केलेल्या उपाययोजनांनुसार अवजड वाहनांना वेगळ्या प्रकारचे दिवे लावावेत. अवजड वाहनचालकांना अतिशय खडतर प्रशिक्षण आणि अनुभव असेल तरच त्यांना ते चालवण्याची परवानगी द्यावी. केवळ वाहन परवानाच नव्हे तर त्यांना ओळखपत्र आणि गणवेशसुद्धा द्यावा.
-अजय भागवत, कोथरूड, पुणे.

मद्य प्राशन करून बेदरकार वाहने चालविणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सक्षम कायदे करावेत. शहरात रस्त्यांवर रात्री अंधार असतो. त्यामुळे प्रखर प्रकाशाचे पथदिवे बसवावेत. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करावेत. अपघात रोखण्यासाठी अशा गंभीर समस्या प्रशासनाने प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे.
-संजय काळे, कोथरूड

काँक्रिट मिक्सर, क्रेन, डंपर, मालवाहू ट्रक अशा अवजड वाहनांना दररोज रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेतच वाहतूक करण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून नेहमीच्या वाहतुकीस अडथळा होणार नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल असे वाटते. अवजड वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. चालकाच्या कागदपत्रांची आणि त्यांनी मद्य प्राशन केले आहे का? याबाबत तपासणी करावी.
-मनोहर जोशी, सनसिटी रस्ता, पुणे.

नऱ्हे गावाच्या परिसरात खाणी असल्याने डंपर, बांधकामे सुरू असल्याने मिक्सर, पाणीटंचाई असल्याने पाण्याचे टँकर तसेच लहान-मोठे कारखाने असल्याने ट्रक अशी अवजड वाहने रस्त्यांवर दिसतात. तसेच अतिक्रमणामुळे रस्ते आणखीन आक्रसून गेले आहेत. त्यात महापालिका प्रशासनाची अनास्था. त्यामुळे आम्ही नऱ्हेवासी गुदमरून गेलो आहोत. प्रशासनाने नऱ्हे गावातील अवजड यमदूतांना रोखावे एवढीच अपेक्षा आहे.
-राजेश बोबडे, नऱ्हे.

हडपसर ते फातिमानगर चौक, मगरपट्टा मागील रस्ता ते नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क, वाडिया महाविद्यालय ते कौन्सिल हॉल चौकापर्यंत सिमेंटचे मिक्सर, डंपर, ट्रक गर्दीच्या वेळातही बिनधास्त चाललेले दिसतात. लोकांच्या जिवापेक्षा काही बिल्डर, वाहतूकदार यांच्यावर मेहेरनजर करण्याचे कारण काय? मिक्सर, मल्टी एक्सल वाहनांचे छायाचित्र पुणे पोलिसांच्या ट्विटरवर पोस्ट केले. त्यांच्यावर कारवाई
करावी.
-शिरीषकुमार गांधी, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी

शहरात अवजड वाहनांना शहराच्या मध्य भागात बंदी घातली आहे. त्याचे जागोजागी मार्गदर्शक फलकही लावण्यात आले आहेत. परंतु त्याचा अवजड वाहनचालकांवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. त्यांच्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, याची माहिती समोर आली पाहिजे.
-परेश खांडके

वाघोली परिसरात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरमधून रस्त्यावर खडी पडलेली असते. डंपर चालकांची आणि पोलिसांची बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका मुलीला अपघातात तिचे दोन्ही पाय गमवावे लागले. फक्त डंपरच नव्हे तर बेदरकार ट्रॅव्हल बस, पीएमपी बसचालकांवरही कारवाई करावी.
- एक पुणेकर

वाहतुकीच्या वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहन दिसल्यास नागरिकांनी त्याचे स्वतंत्र ॲपद्वारे छायाचित्र, पत्ता आणि वेळ पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या एक्स (ट्विटर)वर पाठवावीत. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनचालकांवर कारवाई वाढवावी.
- राहुल दैठणकर, पुणे

डंपर चालकांसह इतर अवजड वाहन चालकांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करावी. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकावर दंडात्मक कारवाई करावी. हडपसर, चंदननगर, खराडी बायपास आणि वडगावशेरी भागात जादा वाहतूक पोलिस कर्मचारी नेमावेत.
-शिवाजी पारडे, ससाणेनगर, हडपसर आणि अयुब महम्मद महात, हौसिंग बोर्ड, येरवडा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.