Sinnar Suburbs Problems : जुन्या बाजारपेठ समस्यांच्या विळख्यात; सरस्वती नदीपात्रात घाण, खासदार पुलाचे कामही रखडलेले
esakal October 22, 2024 10:45 PM

सिन्नर : औद्योगीकरणामुळे शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. मात्र, जुने सिन्नर शहर, बाजारपेठ परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बाजारपेठेतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांतून सिन्नरकरांना वाट शोधावी लागत आहे. या भागात असलेली मंदिरे, शाळा, शासकीय इमारती यांच्या सभोवताली अतिक्रमणे वाढली आहेत. त्यावर कोणाही बोलत नाही. दोन वर्षांपूर्वी सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत पाणी शिरले होते. (Dirt in Saraswati river bed due to old market problems work of MP bridge also called )

यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. सरस्वती नदीपात्रात घाण साचली आहे. तिची स्वच्छता केली जात नाही. या नदीवरील खासदार पुलाचे कामही रखडलेले आहे. मुख्य बाजारपेठ ही सिन्नर शहराची ओळख. जुने सिन्नर म्हणूनही बाजारपेठेची ओळख आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने येथे सिन्नरकरांची मोठी गर्दी असते. शहराचा विकास होत असला, तरी हा भाग विकासापासून वंचित आहे. बाजारपेठेतील रस्ते खड्डेमय झालेले आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. मात्र, अद्यापही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

नाशिक वेस, गणेश पेठ, नेहरू चौक, शिंपी गल्ली, भैरवनाथ मंदिराच्या समोरील आणि नाशिक वेशीमधील बाजारपेठ असलेल्या भागात अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्यावरच व्यावसायिकांची दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. चारचाकी वाहने बाजारपेठेत घुसली, तर सर्व बाजारपेठेतील वाहतूकव्यवस्था कोलमडून पडते. यातच भटक्या जनावरांचा उपद्रव मोठा आहे. भटकी जनावरे रस्त्यावर बसून असतात.

त्यामुळे बाजारपेठेमधील रस्त्ये जाम होतात. बाजारपेठेतून वाहत असलेल्या सरस्वती नदीपात्रात सर्वत्र घाण पसरली आहे. बाजारपेठेतील कचरा सरार्सपणे यात टाकला जातो. प्लॅस्टिक बाटल्यांचा खच पात्रात साचला आहे. पात्राची नियमित स्वच्छता होत नाही. भैरवनाथ मंदिरासमोर नदीवर खासदार पूल आहे. २०२२ मध्ये आलेल्या महापुरामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले. त्यांची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. बाजारपेठेतील कचरा नियमित उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कचऱ्याचे जागोजागी ढीग साचलेले दिसतात. ()

सिन्नरकरांच्या समस्या

- सरस्वती नदीपात्रात घाणीचे साम्राज्य

- खासदार पुलाचे कामे रखडले

- बाजारपेठेतील रस्त्यांची दुरवस्था

- शाळा, मंदिरे, दुकानांभोवती वाढते अतिक्रमणे

- वाहतूक कोंडीने सिन्नरकर त्रस्त

''सरस्वती नदीपात्रात घाण टाकली जाते. तिची स्वच्छता नियमित होत नाही. वाढत्या घाणीमुळे पावसाळ्यात अनेकदा पाणी पात्राबाहेर येते. नदीला कठडा देखील नाही. बाजारपेठेतील रस्त्यावर खड्डे आहेत.''- मयूर गोळे, व्यावसायिक, भैरवमंदिर परिसर

''दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत पाणी शिरले होते. त्या वेळी खासदार पूल नव्याने बांधला जाईल, अशी घोषणा झाली होती. परंतु अद्यापही पुलाचे काम झालेले नाही.''- दिलीप मोरे, व्यावसायिक, देवीमंदिर परिसर

''बाजारपेठेत स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे गल्लोगल्ली कचरा असतो. नदीपात्रात घाण पसरलेली आहे. नदीचे पावित्र्य ठेवले जात नाही.''- माणिक जाजू, व्यावसायिक, जुनी वेस परिस

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.