कर्तृत्त्वाच्या जोरावर उभा केलेला संपर्क
esakal October 22, 2024 10:45 PM

सरकारनामा पानासाठी
--
टीपः swt२२.jpg मध्ये फोटो आहे.
अप्पासाहेब गोगटे

कर्तृत्त्वाच्या जोरावर उभा केलेला संपर्क

आठवण जुन्या लढतींची; अप्पा गोगटेंची देवगडला आजही आठवण

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले की काही राजकीय व्यक्तिमत्वांचा उल्लेख केल्याशिवाय राजकारण पुढे सरकतच नाही. तत्कालीन स्थितीत कोणतीही प्रसारमाध्यमे तेज नसताना, संपर्काची साधने अपुरी असतानाही अशा व्यक्तिमत्वांची गावागावात असलेली ओळख त्यांच्या विकास कामांची पोचपावती ठरे. माजी आमदार जनार्दन मोरेश्वर तथा अप्पासाहेब गोगटे हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व. तत्कालीन देवगड विधानसभा मतदारसंघाची त्यांच्या कार्यकतृत्वाची छाप आज मतदारसंघाच्या विस्तारीकरणानंतरही कायम आहे. जेव्हा -जेव्हा निवडणूका जाहीर होतात त्यावेळी ‘आज अप्पा असते तर’ अशीच भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ओठावर येते.
आज कणकवली विधानसभा मतदारसंघाची निवडणूकीच्या राजकीय पटलावर ओळख असली तरी त्याचा धागा तत्कालीन देवगड विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेलेला आहे. माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यकाळापासून भाजपचा बालेकिल्ला अशी मतदारसंघाची बनलेली ओळख आज मतदारसंघाच्या पुर्नरचनेतही आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कायम आहे. खरंतर तत्कालीन देवगड विधानसभा मतदारसंघावर सुरूवातीला समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. त्यानंतर या मतदारसंघाचे काँग्रेसने प्रतिनिधीत्व केले. भाजप पक्षाच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये अप्पासाहेब गोगटे यांना काँग्रेस विरोधात रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, तत्कालीन काँग्रेस उमेदवार अमृतराव तथा दादा राणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, भाजपने मतदारसंघाचा पाठलाग सोडला नाही. १९८५ मध्ये झालेल्या लढतीत भाजप उमेदवार अप्पासाहेब गोगटे विजयी झाले आणि त्यावेळेपासून भाजपची मतदारसंघावरील पकड घट्ट होत गेली. पुढे भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांची हिंदुत्वाच्या मुद्यावर युती झाली. तत्कालीन जागा वाटपानुसार ही जागा भाजपला तर जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तीन मतदारसंघाच्या जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे देवगड मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला भविष्यात संधी मिळण्याची शक्यता मावळल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यातूनच एकदा शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्याकडून बंडखोरी झाली होती. मात्र तत्कालीन आमदार आणि शिवसेना नेते नारायण राणे यांच्या खमक्या भुमिकेमुळे युतीचा विजय होऊन येथील जागी भाजपचे उमेदवार अप्पासाहेब गोगटे हेच निवडून आले. सलग चारवेळा अप्पांनी देवगड विधानसभा मतदारसंघाचे चढत्या मताधिक्याने प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी भाजपची अनेक नेतेमंडळी अप्पांच्या सतत संपर्कात असायची. अप्पांच्या प्रत्येक प्रचारसभेला प्रमोद महाजन यांची सभा ठरलेली असे. अप्पांच्या कार्यकाळातच राज्यात युतीची सत्ता आली होती. त्यावेळी मंत्रीपदाची आयती संधी चालून आली असताना ती नम्रपणे नाकारणारेही अप्पाच होते. अप्पांच्या कारकिर्दीत राम नाईक, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांचे येथे दौरे झाले. अप्पानंतर देवगड मतदारसंघाचा उत्तराधिकारी कोण असे वाटत असतानाच २००४ मध्ये भाजपने अप्पांचे पुतणे अॅड. अजित गोगटे यांना उमेदवारी दिली आणि त्यांची आमदार म्हणून वर्णी लागली. त्यावेळी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ होते. त्यावेळी वैभववाडी तालुका जिल्ह्यात असतानाही तो पन्हाळा -बावडा मतदारसंघाला जोडला गेला होता. पुढे २००९ मध्ये मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि देवगड विधानसभा मतदारसंघाचा कणकवली विधानसभा मतदारसंघ झाला. त्यावेळी झालेल्या पहिल्याच निवडणूकीत भाजपचे प्रमोद जठार विजयी झाले. त्यामुळे सलग तीस वर्षे या मतदारसंघावर भाजपचा पगडा राहिला. मात्र त्यानंतर काँग्रेसमधून नीतेश राणे विजयी झाले आणि ही परंपरा खंडित झाली. पुढे नीतेश राणे हेच भाजपमध्ये डेरेदाखल होऊन २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. आता नीतेश राणे तिसर्यांदा तर भाजपमधून दुसर्यांचा रिंगणात राहणार आहेत. त्यांच्या विजयासाठी भाजपची आतापासूनच रणनिती सुरू झाली आहे.
..................................................
कणकवली मतदारसंघाचा उदय
तत्कालीन देवगड विधानसभा मतदारसंघात संपूर्ण देवगड तालुक्याबरोबरच कणकवली आणि मालवण तालुक्यातील काही गावांचा समावेश होता. मात्र, मतदारसंघाच्या पुर्नरचनेत त्यामध्ये बदल होऊन देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यांचा मिळून कणकवली मतदारसंघ उदयाला आला.
.........................................
राणेंच्या प्रवेशानंतर भाजपची ताकद द्विगुणित
मतदारसंघात अप्पांच्या कार्यकाळापासून आधीच असलेली भाजपची ताकद आमदार नीतेश राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर द्विगुणित झाली. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघाने भाजपला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून आता विधानसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू झाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.