शिधापत्रिकाधारकांचा ऐन दिवाळीत होणार हिरमोड
esakal October 23, 2024 06:45 AM

पिंपरी, ता. २२ ः पिंपरी-चिंचवड शहरातील शिधापत्रिकाधारक यंदा सणाच्या दिवशी आनंदाच्या शिधापासून वंचित राहणार आहेत. आचारसंहितेत आनंदाचा शिधा वाटपाला खो बसला आहे. त्यामुळे दिवाळीत शहरातील साडे तीन शिधापत्रिकाधारकांचा हिरमोड होणार आहे.

दिवाळीत राज्य शासनाकडून दरवर्षी शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्यात येतो. त्यामध्ये साखर, रवा, हरभराडाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तूंचा समावेश असतो. पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी, चिंचवड आणि पिंपरी हे तीन कार्यालयांतर्गत साडे तीन लाख शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. त्यांना या योजनेचा लाभ होतो. मात्र, यंदाच्या दिवाळीत या आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे शिधावाटप थांबवले आहे. या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात. त्यावर सत्ताधाऱ्यांची छायाचित्रे असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता हा शिधाच वाटण्यात येणार नसल्याने शिधापत्रिकाधारकांमध्येही नाराजीचा सूर आहे.

‘दरवर्षी आनंदाचा शिधा दिला जातो. यंदाच्याही वर्षी मिळणे अपेक्षित होते. मात्र, तो येणार नसल्याचे समजले. निवडणुकीमुळे नागरिकांना वाटप करणे थांबविणे चुकीचे आहे.’’
- आनंद थोरात, शिधापत्रिकाधारक.

‘‘दरवर्षी आनंदाचा शिधा वाटप केला जातो. मात्र, यंदा त्याचे वाटप केले जाणार नाही.’’
- गजानन देशमुख, परिमंडल अधिकारी, भोसरी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.