वाईट प्रदर्शनानंतरही सिराजला पुणे कसोटीत मिळणार संधी? सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
Marathi October 23, 2024 07:24 AM

भारत आणि न्यूझीलंड संघात बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता या स्टार वेगवान गोलंदाजाला पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळले जाऊ शकते अशी चर्चा आहे. सिराजच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित होत असताना भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटे यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डोशेटे यांचे मत आहे की, मोहम्मद सिराज चांगले प्रदर्शन करत असून त्याला कोणत्याही प्रकारे आऊट ऑफ फॉर्म खेळाडू संबोधले जाऊ शकत नाही. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या तासात शानदार गोलंदाजी केली होती. अशा स्थितीत तो लयीत नाही असे मानता येणार नसल्याचे टेन डोशेटेंचे म्हणणे आहे.

ते म्हणाले की, “दुसऱ्या डावात सिराजने शानदार गोलंदाजी केली. शेवटच्या दिवशी सकाळी (बेंगळुरू कसोटीचा 5वा दिवस) कसोटी सामन्यातील एक तासाचा खेळ खरोखरच छान होता.”

पुढे गोलंदाज सिराजचे समर्थन करत त्यांनी सांगितले की, “कदाचित ती विकेट त्याच्या नशिबात नसावी, जी साहजिकच त्याची सर्वात मोठी ताकद आहे, विशेषत: डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी जेव्हा तो पुढे गोलंदाजी करतो. तो चांगली गोलंदाजी करत नाही किंवा त्याची लय चांगली नाही असे म्हणण्यासारखे काही नाही.”

यानंतर डोशेटेंनी कबूल केले की सिराज विकेट घेऊ शकला नाही, परंतु त्यांनी असेही सांगितले की ही चिंतेची बाब नाही. “कदाचित तो विकेट घेण्यास सक्षम नव्हता. पण ही काळजी करण्यासारखी बाब नाही. मी विशेषत: वेगवान गोलंदाज आणि नवीन चेंडूबद्दल विचार करत नाही, परंतु परिस्थितीनुसार थोडे अधिक खेळणे यावर आम्ही काम करत आहोत. अर्थात, सुरुवातीला चांगली गोलंदाजी करणे खूप कठीण होते, कारण बॉल सीम होत नव्हता. मात्र पुढील सामन्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा वेगवान गोलंदाजी हा योग्य पर्याय असेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.