लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
विजय केसरकर, एबीपी माझा November 06, 2024 01:43 PM

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.

संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी?

कोल्हापूरमध्ये  बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. ते पुढे म्हणाले की राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? अशी विचारणा फडणवीस यांनी केली. लाल सविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम यामधून होत असल्याचे ते म्हणाले.

अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे

त्यांनी सांगितले की, भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.