इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या पुढील अडचणी वाढतच चालल्या असून, त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या विरोधात बंडाळी सुरू झाली आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना तिसरा धक्का बसला आहे. यापूर्वी भरत शहा व अप्पासाहेब जगदाळे यांनी त्यांची साथ सोडली आहे.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मयूरसिंह पाटील यांनी प्रवीण माने यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, ‘‘जनता आता आजी- माजी उमेदवार नको, असं म्हणत आहे. जे विचार घेऊन मी काम करत होतो, त्यांना तिलांजली देण्याचे काम आमच्या घरातल्या लोकांनी केले. त्यामुळे तालुक्याची विल्हेवाट लागायला लागली आहे.
सहकारी संस्था हुकूमशाही पद्धतीने चालवण्यात आल्या. आम्ही काम करत होतो, तेव्हा वरून आदेश आल्याशिवाय काही होत नव्हतं. त्यांनी मंत्रिपदाचा, आमदाराकीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करणं आवश्यक होतं, पण तसं चित्र दिसलं नाही.’’