सोलापूर: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोलापूर जिल्ह्यातील 90 टक्के जागांवर विजय मिळवेल, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. महायुती सरकारकडून अनेक क्षेत्रात चुकीचे काम झाले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे 170 आमदार निवडून येण्याची परिस्थिती आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते गुरुवारी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात 2014 सालानंतर नेत्यांची भाषा बदलण्यात देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस काय करतात? छोटे नेते संभाळून ठेवतात कारण ते मोठे नेत्यांवर भुंकण्यासाठी असतात. मग अशा छोट्या नेत्यांना बिस्किट म्हणून पद दिले जाते.मोठ्या नेत्यांवर फडणवीस साहेबांना बोलता येत नाही. त्यामुळे ते नंतर त्या छोट्या छोट्या नेत्यांना फोन करून बोलायला सांगतात. सदाभाऊ खोत यांच्याबद्दल बोलणंही आजही उचित नाही, त्यांचे विचार आणि वक्तव्य गेले आहेत. या सर्वांसाठी कारणीभूत फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. संजय राऊत साहेब हे त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देतात. लोकांनी या नेत्यांना लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर द्यावं, असे रोहित पवार यांनी म्हटले.
यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अनेक अतिडाव्या आणि नक्षली विचारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस अभिमन्यू आहेत का नाही आहेत? हे मला माहित नाही. मात्र या नव्या युगातले ते जनरल डायर मात्र नक्की आहेत. महायुतीच्या काळात फडणवीस गृहमंत्री होते. त्यांनी पोलीस प्रशासनात चुकीच्या पद्धतीने वापर केला. फडणवीस यांच्या सांगण्यावरून अनेकांवर लाठीचार्ज झाला. त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलं असा रिपोर्ट द्या तर त्यांनी दिला असेल. भारत जोडो यात्रेला वर्ष पूर्ण झाले आता का आठवते त्यांना. फडणवीस हे संविधाना विषयावर जर ते चर्चा करत असतील तर मला वाटते महत्त्वाच्या मुद्द्यावरून ते लक्ष दुसरीकडे घेऊन जात आहेत. ते स्वतः वकील आहे पण त्यांनी कधी संविधान वाचलं असेल असे वाटतं नाही. संविधान वाचलं असतं तर फडणवीस साहेब भाजपमध्ये नसते. गुजरातची लाचारी सोडून फडणवीस साहेबांनी मुद्द्याचं बोलावं, असे रोहित पवार यांनी म्हटले.
रोहित पवार यांनी महाराष्ट्रात कडवट हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमकपणे प्रचार करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही इशारा दिला. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशची स्टाईल स्वाभिमानी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे कटेंगे’वाल्यांची सत्ता येणार नाही, तिथे अखिलेश यादव आणि काँग्रेसचे सरकार येणार आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश स्टाईल आणू नका. नाहीतर जाताना त्यांना अडचण होईल एवढा भान ठेवावं. योगी आदित्यनाथ आले भाषण करायला आणि ते सरकार घालवून जातील.
आणखी वाचा
अधिक पाहा..