माणूस मृत झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्याची प्रथा प्रत्येक समाजात आहे. कित्येकदा घरात पाळलेल्या आणि अतिशय प्रिय असलेल्या प्राण्याचा मृत्यू झाला, तर त्याच्याही कलेवराचा अंत्यविध केला जातो. तथापि, एखाद्या वस्तूचा अंत्यविधी ही क्वचित घडणारी घटना आहे. गुजरातमध्ये एका कुटुंबाने आपल्या 12 वर्षे जुन्या कारचा अंत्यविधी नुकताच केला आहे. या अंत्यविधीला तब्बल दीड हजार लोकांची उपस्थितीही होती. हा अंत्यविधी साधा नव्हता. त्यासाठी या कुटुंबाने लक्षावधी रुपयांचा खर्चही केला आहे. ही कार त्या कुटुंबाचा भाग्योदय करणारी ठरली होती. त्यामुळे या कुटुंबाचे या कारवर अतिशय प्रेम होते. त्यामुळे जुनी झालेली ही कार विकण्याऐवजी त्यांने या कारला ‘समाधी’ दिली आहे.
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या जिल्ह्यातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक संजय पलोरा यांची ही कार होती. ती ‘वॅगन आर’ या प्रकारची होती. 12 वर्षांपूर्वी पलोरा यांनी ती खरेदी केली. त्यानंतर त्यांचा व्यवसायाची अतिशय भरभराट झाली. या कारचा पायगुण त्यांना लाभदायक ठरला आहे, अशी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भावना आहे. त्यामुळे ही कार जुनी झाल्यानंतर ती विकण्यास पलोरा यांचे मन तयार झाले नाही. त्यांनी या कारला समाधी देण्याचा निर्णय घेतला. या कारचा अंत्यविधी करण्यापूर्वी तिला फुलांनी आणि हारांनी सजविण्यात आले होते. कारची विधिवत् पूजा करण्यात आली. पूजेसाठी पुरोहितांना बोलाविण्यात आले होते. पूजा झाल्यानंतर कारवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. मंत्रोच्चारण करण्यात आले. कारभोवती पलोरा कुटुंबिय आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी गरबा नृत्यही केले. नंतर मोठ्या सन्मानाने या कारचा अंत्यविधी करण्यात आला, अर्थात, त्या कारला समाधी देण्यात आली. हा सर्व कार्यक्रम पलोरा कुटुंबाच्या शेतभूमीत करण्यात आला. ज्या कारने आपला भाग्योदय घडविला, त्या कारचा यथोचित सन्मान केल्याचे समाधान त्यांना आहे.