मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीमधील सभेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर या मनसेच्या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खूर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याचेही समजतंय. दरम्यान, याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवणार असल्याचे म्हणत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी यावं, असं खोचकपणे वक्तव्य करत मनोज चव्हाण यांनी भाष्य केले. राजकीय विचार कसे असावेत आणि विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी या सभेला या, असं म्हणत राज ठाकरेंच्या विक्रोळीमध्ये होणाऱ्या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण देण्यात आलंय.