► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली असून तो 6.2 टक्क्यांवर पोहचला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याचे प्रमाण त्यापूर्वीच्या 9 महिन्यांमधील सर्वात जास्त म्हणजे 5.5 टक्के होते. तथापि, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर यापेक्षाही अधिक वाढला असून त्याने गेल्या चौदा महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे. शहरी भागांमध्ये हा दर 5.6 टक्के तर ग्रामीण भागात तो 6.7 टक्के इतक्या पातळीवर पोहचल्याची माहिती देण्यात आली.
फळे, भाज्या, खाद्यतेल आणि चरबी यांच्या दरांमध्ये मोठी वाढ ऑक्टोबरात दिसून आली. त्यामुळे एकंदर किरकोळ महागाई दर वाढला. तथापि, डाळी, अंडी, साखर आणि मसाल्याचे पदार्थ यांच्या दरवाढीत याच महिन्यात मोठी घटही झाली. ग्राहक अन्नधान्य दर निर्देशांक याच महिन्यात 2.6 टक्क्यांनी वाढला असून ही वाढ शहरी आणि ग्रामीण भागात समान असल्याचेही दिसून येत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत…
गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ग्रामीण भागात किरकोळ महागाई दरात तब्बल 10.7 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर शहरी भागातील अन्नधान्य दरवाढ निर्देशांकाची वाढ त्याहीपेक्षा जास्त म्हणजे, 11.11 टक्के आहे. पुरवठा साखळ्यांमध्ये काही प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने ही दरवाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्याने मागणी आणि पुरवठा यांच्यात अंतर राहिले. त्यामुळे भाववाढ झाल्याचीही माहिती देण्यात आली.
आगामी महिन्यांमधील संभाव्य स्थिती
आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये अन्नधान्ये, भाज्या आणि फळे यांच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. खरीपाच्या हंगामातील पिके बाजारात आल्यानंतर पुरवठ्याची परिस्थिती सुधारुन जीवनावश्यक वस्तूंचे दर काही प्रमाणात तरी कमी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य प्रश्न फळे आणि भाज्या यांचा असून अनियमित पावसाचा परिणाम त्यांच्या दरांवर होत असल्याचे दिसून येते. मात्र, फळे आणि भाज्या या नाशवंत वस्तू असल्याने त्यांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्यांचे दर कमी होऊ शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.