बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
एबीपी माझा वेब टीम November 14, 2024 11:13 PM

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : आम्ही जो मार्ग स्विकारला त्याची फळं महाराष्ट्र चाखत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 पट पैसे दिले आहेत. त्यामुळं विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. अडीच वर्षाच्या ग्रहणातून आम्ही राज्याला सोडवण्याचे काम केले आहे. कारण बंद सम्राट मुख्यमंत्री पदावर बसले होते. धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते तर सांगा. बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्दव ठाकरेंवर प्रहार केला. 

जिथे बाळासाहेबांचा आवाज घुसायचा तिथे महायुतीचा हुंकार घुमणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मोदीजींचे मी मनापासून स्वागत करतो. स्वाभिमान का बुलंद नारा है मोदी, चमचमता तारा है मोदी असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोनं वाटायचे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ( Prime Minister Narendra Modi) विचारांचे सोनं वाटायला आले आहेत, आज दसरा तर 23 ला दिवाळी साजरी करायची आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. फटाके तयार ठेवा असे ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकासकामांची उद्घाटनं केली आहेत हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. मोदी आमचे मित्र फिलॉसॉफर आणि गाईड पण आहेत. पंतप्रधान मोदींनी मुंबईला वर्ल्ड फायनान्स सेंटर आणि फिनटेक सेंटर बनवण्याचं सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

लाडकी बहिण योजनेने गेम चेंज केलाय, त्यामुळं मविआच्या पायाखालची वाळू सरकली

प्रकल्पांना स्पीड ब्रेकर टाकले होते ते पुन्हा सुरु केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  परकीय गुंतवणुकीत एक क्रमांकावर आहोत.  लाखोंना संधी मिळत आहेत. लाडकी बहिण योजनेने गेम चेंज केला आहे, त्यामुळं मविआच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मविआ कोमात गेली आहे. काम केलं भारी आता पुढची तयारी असे मुख्यमंत्री म्हणाले. कालपर्यंत लाच देतायत का? भीक देतायत का? असं म्हणत होते. आता महिला जोडे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.आमच्याच योजना चोरायला लागलेत. यांची पंचसूत्री नव्हे थापासूत्री असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  कॉपी करणारे कधी पास होतात का? मविआने 10 वर्ष मागे ठेवलं होतं. आता समृद्धी नांदत आहे, त्यामागे महाशक्ती आहे त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी असे मुख्यमंत्री म्हणाले. महासत्तेकडे महाराष्ट्र चालला आहे . मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार आहे. प्रकल्पांचा पुनर्विकास करणार आणि हक्काचे घर देणार हा आमचा शब्द आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.