तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
नितीन ओझा, एबीपी माझा November 14, 2024 11:13 PM

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आता नेतेमंडळींनी धडाका लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्यासाठी सभा घेतली. विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, जास्तीत जास्ती निधीसाठी अधिकाधिक मतांनी तुम्ही आपला उमेदवार निवडून द्या, असे आवाहन अजित पवारांनी (Ajit pawar) केले. आशुतोषने जे जे मागितलं ते देण्याचा प्रयत्न मी व महायुतीच्या सरकारने केला. यापुढील काळात देखील आशुतोष जो हट्ट करेल तो मी पुरा करेल, निधी कमी पडू देणार नाही. जेवढा जास्त लीड द्याल तेवढा जास्त निधी द्यायचा दावा अजित पवार तुम्हाला करतो, असे म्हणत अजित पवारांनी कोपरगाव (Kopargaon) मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी, अजित पवारांना भाषण करताना खोकला लागल्यानंतर आमदाराने पाणी दिलं, त्यावर त्यांनी मिश्कील टोला लगावला. 

अजित पवारांनी येथील सभेत बोलताना म्हटले की, परवा मोदींच्या सभेत माझी खुर्ची त्यांच्या शेजारी होती, त्यांनी संपूर्ण राज्याचा आढावा माझ्याकडून घेतला. तुम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी मिळाली आहे. मात्र, पुढील काळात केंद्राचा जास्त निधी आम्हाला लागेल, लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहून जाणारं पाणी वळवण्यासाठी निधीची मागणी मी त्यांच्याकडे केली. निळवंडेचे काम अनेक वर्ष रखडलं होतं, पुढारी यायचे नारळ फोडायचे. मात्र, अनेक वर्षे काम काही झालं नाही, आता ते पूर्ण झाला आहे, असे अजित पवारांनी म्हटलं. यावेळी, भाषण करताना अजित पवारांना अचानक खोकला आल्यामुळे आशुतोष काळे यांनी पाणी दिल्यावर तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं, पाण्यासारखं पुण्य नाही.. असा डायलॉग अजित पवारांनी मारला. त्यामुळे, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, भाषण करताना अजित पवारांना अनेक वेळा खोकला येत होता, त्यामुळे त्यांनी गोळी देखील घेतली.

लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांना टोला

लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा घोषणेचा अपप्रचार विरोधकांनी केला. हे हिंदुराष्ट्र घोषित करतील, मुस्लिमांना पाकिस्तानला पाठवणार अस खोटं बोलत होते, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. गेल्या अडीच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. समृद्धी महामार्ग झाला, अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. अजून साडेचार वर्ष मोदी साहेबांचं सरकार आहे, जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. विरोधक करून घेऊ शकत नाहीत, देवेंद्रजींनाही मोठा अनुभव आहे, एकनाथजी सुद्धा सीनियर मंत्री आणि मलाही अनुभव आहे. लाडकी बहीण सुरू करताना सगळा विचार करून बजेट आणलं आणि योजना दिली. तुमच्या काळात सव्वा रुपये सुद्धा कोणाला दिला नाही आणि आम्हाला दीड हजाराच्या गप्पा हाणता, असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. विरोधी लोक ही योजना बंद करायला कोर्टात गेले, बरेच दिवस सत्ता नसल्याने त्यांच्यावरही परिणाम झालाय. आम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना पाच वर्ष सुरू ठेवायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं तर ते असं.. वीस तारखेला मतदान करताना महायुतीला मतदान करा, असे अजित पवार यांनी म्हटले. 

राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.