Aditya Thackeray On Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद आणि आम्हाला आता गरजही पडणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्यासाठी दार बंद करा खिडक्या बंद करा, महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असा दावाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीय, असं म्हटलं आहे. यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे ? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा, एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद आहेत...ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी मागच्या दरातून प्रकल्प गुजरातला नेले... त्यांच्याकडे परत कोण जाणार?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
जो पक्ष पाच वर्ष झोपलेला असतो तो निवडणूक आल्या की तोडफोड करतो. मारामारी करतो सेटल होतो, सेटलमेंटकडून निवडणूक लढतो. त्यांना आम्ही महाराष्ट्रात नेमकं काय काम केलं हे कळणार कसं?, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केली. मनसेचं असं झालंय त्यांनी बिनशर्ट पाठींबा दिल्यानंतर ते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचे बोलतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज केला. वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, त्यांना पाठिंबा देत आहे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचे मनसे विसरून गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra CM) कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.