बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट
अंकिता खाणे November 15, 2024 06:13 PM

बारामती: लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपल्या पुतण्याला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे.

अजित पवारांचा गेल्या निवडणुकीत विक्रमी विजय 

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी या जागेवर भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी 1,65,265 मतांनी पराभव केला होता.आता अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत. अशा स्थितीत किमान आपला आधीचा विक्रम कायम राखण्याचा दबाव त्यांच्यावर असणार आहे. अशातच लोकसभेप्रमाणे विधानसभा देखील चुरशीची ठरणार आहे. युगेंद्र पवार अजित पवारांचा विक्रम मोडणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांनी रणनीती बदलली

लोकसभेत झालेल्या चुकातून धडा घेत अजित पवार शरद पवारांवर फारसे बोलताना दिसत नाहीत. बारामतीचा शहरी मतदार अजित पवार यांच्यासोबत दिसत आहे. शरद पवारांचे आजही ग्रामीण भागात चाहते आहेत. यानंतरही बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनता कोणत्या बाजूने आहे, हे विधानसभा निवडणुकीतून बऱ्याच अंशी स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने लोकांमध्ये नाराजी होती आणि त्यांनी ती मतदानातून व्यक्त केली असंही अनेकदा म्हटलं जातं. पण, विधानसभा निवडणुका वेगळ्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीने समीकरण बदलणार?

2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यापूर्वी दिल्लीत सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्रात अजित पवार पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे पक्षात बोलले जात होते. मात्र, अजित पवार यांनी बंडखोरी करून पक्ष हातात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण बदललं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरोधात लाट होती. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही आव्हानात्मक मानली जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.